Weather Update : महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट, 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट, IMD चा झोप उडवणारा इशारा

पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट, 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट, IMD चा झोप उडवणारा इशारा
Maharashtra Weather Forecast
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 7:32 PM

एप्रिल महिना सुरू झाला आहे, सर्वसामान्यपणे एप्रिल महिन्यात देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा कडका चांगलाच जाणवत असतो, प्रचंड उष्णता असते. मात्र यंदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा प्रति तास 70 किमी एवढा राहू शकतो, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिमी विक्षोभ पूर्णपणे सक्रिय झाला आहे, याचा परिणाम देशातील जवळपास सर्वच राज्यांवर पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये तर अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात घट होईल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील 48 तास हे धोक्याचे असणार आहेत.

कोण -कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा?

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, यातील काही राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला असून, जवळपास 20 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 20 पैकी 13 राज्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर 7 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

Follow Us