
महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु झाला आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस झाला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सर्वाधिक २७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास राजस्थान, गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून दोन ते तीन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. पण सध्या महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह गोवा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.