
“भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक तालुक्यांमध्ये ताकदीने वाढला पाहिजे. येत्या निवडणुकांमध्ये महायुती सोडून अन्य कोणीही सत्तेत येणार नाही असे काम करा. या जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप निर्माण करा” असे आवाहन मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. यावेळी नितेश राणे यांनी एक फतवाही सोडला.
कुडाळ तालुक्यात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण,पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी आमदार असताना मला खूप त्रास दिला गेला. “विरोधी आमदार असताना निधी देण्यावरून सुद्धा मला डावललं गेलं”, असे नितेश राणे म्हणाले.
“भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष असला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्या जणांची असली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नको. महायुतीबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, मात्र विरोधकांना दूर ठेवणारा विकास हवा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा”, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
“तुम्हालाही न्याय देऊ आणि गावातील विकासाला साथ देऊ. जिल्हा नियोजनचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी असो हा विकास निधी महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल, असा विधानही नितेश राणेंनी केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला जाणार आहे. महाविकासआघाडीचा सरपंच असेल तर त्याला एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही. भाजपमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल. उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा”, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केले.
“येणाऱ्या दिवसात जिल्हा नियोजनचा निधी असेल, पक्षाचा असो किंवा सरकारचा कोणताही निधी फक्त महायुतीच्या उमेदवारांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की ज्या ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांची यादी काढा. त्या गावांना एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. गावाचा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा”, असा फतवा कुडाळचे आमदार नितेश राणे यांनी काढला आहे.