रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यात गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद…
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमधे रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे. आता या सर्वांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रुपाली चाकणकर यांनी तक्रारीत काय म्हटले?
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते की, अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मी तिथे जात होती. 18 मार्च 2026 रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे प्रसार माध्यमांमधून समजले. त्यानंतर खरात यांच्यासोबत सामाजिक कार्यक्रमातील फोटो वापरून माझ्यावर आरोप करण्यात आले. 20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासताना 19 फेसबुक / इंस्टा / युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचे आढळले. या सर्वांची नावे आणि पोस्टचे स्क्रीनशॉट चाकणकर यांच्याकडून पोलिसांना देण्यात आले आहेत. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आगामी काळात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.