NIA ची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; 23 वर्षीय तरुण ताब्यात, पाकिस्तानच्या दहशतवाद्याशी संपर्काचा संशय

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएनं मोठी कारवाई केली आहे. 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याचा पाकिस्तानस्थित दहशतवाद्याशी संपर्क असल्याचा संशय आहे. देशभरातील 12 ठिकाणी छापे टाकून एकूण 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

NIA ची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई; 23 वर्षीय तरुण ताब्यात, पाकिस्तानच्या दहशतवाद्याशी संपर्काचा संशय
NIA ची छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई
Image Credit source: Tv9
| Updated on: May 31, 2026 | 10:05 AM

देशभरात दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA नं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत छत्रपती संभाजीनगरमधूनही एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. शेष नारायण असं या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथला रहिवासी आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून तो वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार म्हणून काम करत होता आणि कमलापूर फाटा इथं वास्तव्यास होता. पाकिस्तानस्थित संशयित दहशतवादी शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरातील 12 ठिकाणी छापे टाकून एकूण 9 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसापासून NIA चं पथक छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात दाखल झालं आहे.

एनआयएनं वाळूज औद्योगित परिसरात असलेल्या शिवाजीनगरमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात छापेमारी केली. जवळपास आठ ते दहा तासांच्या चौकशीनंतर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या चौकशीतून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजीनगरमधील श्रद्धा कॉलनीळा पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घातल्याने छावणीचं स्वरुप आलं होतं. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

या परिसरातील नवीन इमारतीत गेल्या काही दिवसांपासून एक परप्रांतीय मोटार मेकॅनिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून एनआयएचं पथक लक्ष ठेवून होतं. त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे शुक्रवारी थेट त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात पथकाच्या हाती अनेक संशयास्पद कागदपत्रे लागली आहेत. या संशयित तरुणाजवळ काही बनावट आधारकार्ड सापडल्याची माहिती आहे. एनआयएनं उत्तर प्रदेशातील पाच, राजस्थान आणि बिहारमधील प्रत्येकी दोन आणि महाराष्ट्रातील तीन अशा एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत विविध डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.

दुसरीकडे दाऊद इब्राहिम टोळी आणि पाकिस्तानच्या आयएसआयशी कथित संबंध असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्रे, हँडग्रेनेड आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे जाळं पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडून उभारण्यात आलं होतं. दिल्लीतील महत्त्वाची सरकारी स्थळे, सुरक्षा दलांचे अधिकारी आणि प्रमुख धार्मिक स्थळांवर हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.

Follow Us