Krishna Andhale : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागला ? नाशिकमध्ये दिसल्याचा दावा

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवर त्याला पाहिले असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी सुरू केली आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Krishna Andhale : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागला ? नाशिकमध्ये दिसल्याचा दावा
परार आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागला ?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 12, 2025 | 1:14 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder case)  यांच्या हत्येला तब्बल 3 महिने उलटले आहेत. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करून त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली तर हत्याकांडातील प्रमुख आंरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. हत्येला तीन महिने होऊमही फरार आरोपीचा शोध घेण्यात अपयश आल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच आता कृष्णा आंधळेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा सुगावा लागल्याची माहिती समोर आली असून तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौकात मंदिराजवळ कृष्णा दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्याच्यासोबत आणखी एक इसम होता. ते दोघेही काळ्या रंगाच्या बाईकवर बसून गेल्याचा दावाही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करून खातरजमा करत आहेत. याआधी जानेवारी महिन्यात देखील कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. नाशिकमध्ये आता पुन्हा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.

संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येसाठी कारणीभूत असलेला कृष्णा आंधळे हा गुन्हेगार असून गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार आहे, पोलिसांची अनेक पथकं त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच पुन्हा एकदा कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

सकाळी तो दिसला आणि दक्ष नागरिकांनी फोन फिरवला

प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार कृष्णा आंधळे व त्याच्यासोबत असलेला एक इसम दोघेही ब्लॅक कलरच्या बाईकवरून जात होते. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक शर्ट घातलेले असे दोघेही सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाले असून ते फुटेज समोर आले आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरातील सुयोजित गार्डन येथील दत्त मंदिराच्या जवळ सकाळी 9 वाजून 38 मिनिटांनी एका इसमासोबत बघितल्याचा दावा रहिवाशांनी केला. त्यानतंर त्यांनी लगेचच 9.42 च्या सुमारास गंगापूर पोलिस स्टेशनला फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला आहे. या सुयोजित गार्डन परिसरात जे सीसीटीव्ही आहेत, त्यांच्या सहाय्याने तेथे नेमकी काय हालचाल झाली तो तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला.

यापूर्वीही नाशिकमध्ये आढळला होता कृष्णा आंधळे

जानेवारी महिन्यातही कृष्णा हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आला होता. तो नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास केला.नाशिक शहरातील नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचे म्हटले जात होते. कृष्णा आंधळे हा शहरात असल्याच्या चर्चेनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले. पोलिसांनी या परिसराची कसून तपासणी केली. मुक्तिधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांनी पाहणी केली. मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तसेच लॉजिंग रेकॉर्डची पोलिसांनी पडताळणी केली होती. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल फोटो कृष्णा आंधळेचे नसल्याचे पोलिसांनी तपासाअंती स्पष्ट केले होते.

दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणी खटल्याची आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे. सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर सुनावणी दरम्यान गैरहजर होते. आरोपींना VC द्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. आरोपीच्या वकिलांनी आरोपी आणि फिर्यादींच्या जबाबाच्या कॉपी देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला. सरकारी वकिलांनी यासाठी 26 तारखेची वेळ मागितली.