Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा, थेट अमित शाहांना पत्र; मागणीची एकच चर्चा!
मुख्यमंत्री बदलण्याची व सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्री करण्याची अमित शहांकडे पत्राद्वारे मागणी, करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe CM Post : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात चर्चा आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. दिग्गज हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांचे परवाने निलंबित आणि रद्द केले आहेत. अन्न सुरक्षेशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे. फक्त अन्नपदार्थांबाबतच नव्हे तर औषधांविषयीही त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर अन्नातील भेसळ कमी झाल्याची भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता याच तुकाराम मुंढे यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री करा, अशी मोठी मागणी केली जात आहे. या मागणीबाबतचे एक पत्रच थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना देण्यात आले आहे.
नेमकी काय मागणी करण्यात आली?
उद्या म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी मुंबईतील हुतात्मा चौकात ‘मराठी एकीकरण समिती’ व ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सध्या पूर्ण तयारी झाली आहे. प्रत्यक्ष आंदोलनाच्या अगोदर या दोन्ही संघटनांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्याकडे एक पत्र पाठवले आहे. याच पत्रात तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे राजकारणात येणार का?
तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत. या मुलाखतींमध्ये तुम्ही राजकारणात येणार का? असे अनेकदा विचारण्यात आलेले आहे. या प्रश्नाचे थेट उत्तर तुकाराम मुंढे यांनी दिलेले नाही. मी भविष्याबाबत काही सांगू शकत नाही, असं त्यांनी या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. असे असताना आता अमित शाहांकडे करण्यात आलेल्या मागणीची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे.
मुंढे येताच काय काय बंद झालं?
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपद स्वीकारताच आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी भेसळयुक्त दुधाविरोधात कारवाई केली. त्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेलमधील अन्नपदार्थांची तपासणी केली. भेळयुक्त मिठाईविरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. अंगणवाड्यातील मध्यान्ह भोजनाचीही त्यांच्या विभागातर्फे तपासणी केली जात आहे. रुग्णाला हव्या तेवढ्याच गोळ्या, औषध द्यावे, जास्त औषध दिल्यास औषधालयांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.