
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज २२ जून २०२५ रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र अद्यप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावणार का, याबाबत उत्सुकता कायम आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या १९ हजार ६५१ इतकी आहे. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होत आहे.
यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. या तिन्ही पॅनेलमध्ये होणारी लढत कारखान्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी श्री शंभुसिह महाराज हायस्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे देखील मतदानासाठी दाखल झाले होते. सुप्रिया सुळे यांनी रंजन तावरे यांना शुभेच्छा दिल्या. रंजन तावरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ही लोकशाही पद्धतीने चालणारी निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मतदारांना आहे, ते तो पार पाडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील.” अशी प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांना चेअरमन पदाच्या उमेदवारीबद्दल विचारले असता त्यांनी त्यावरही थेट विधान केले. “मी चेअरमन पदाचा उमेदवार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? मी ३५ वर्षे इथे काम करतोय” असे उत्तर त्यांनी दिले. सुप्रिया सुळे यांच्या बँक चौकशीच्या मागणीवर, “कुणी काहीही मागणी केली तर मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही,” असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
पीडीसीसी बँक उघडी असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी तावरे गटाला टोला लगावला. “ज्या दिवशी आचारसंहिता सुरू झाली त्या दिवसापासून शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा तिथेच आहे. ज्याचं त्याला लखलाभ, मला त्यात पडायचं नाही. पिडीसीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनलचा एक तरी सदस्य होता का? जे कोणी असेल त्यांना प्रश्न विचारा. आताही चला तिथे लोक बसलेले असतील. सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही, तिथे बसून त्यांचा प्रचार करता येत नाही, याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतं. मला रात्री फोन आलेला, दादा तिथे स्कॉड पाठवा, बघा काय होतंय ते. काय करायचं, ज्याचं त्याला लखलाभ.” असे अजित पवार म्हणाले.