बारामतीत एकाला बेदम मारहाण, CCTV येताच अजितदादा संतापले; म्हणाले, लाज वाटली…

बारामतीत वैद्यकीय महाविद्यालय परिसरात धक्कादायक घटना घडली आहे, येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण झाली आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

बारामतीत एकाला बेदम मारहाण, CCTV येताच अजितदादा संतापले; म्हणाले, लाज वाटली...
ajit pawar and baramati clash
| Updated on: Apr 06, 2025 | 11:35 AM

बारामती : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मारहाण, खुनाची काही धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत. या प्रकरणांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आता बारामतीतून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. तेथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. याच प्रकरणाची दखल आता उपमुख्यमंत्री तथा बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी सज्जड दम दिलाय. यापुढे असं कृत्य कोणी केलं तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

नेमकं काय घडलं होतं?

बारामती तालुत्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ 3 एप्रिल रोजीचा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. हातात मोबाईल घेऊन ही व्यक्ती काहीतरी करत असल्याचं दिसतंय. याच वेळी अचानकपणे दोन लोक त्याच्याकडे आलाआहे. या लोकांनी खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला थेट मारहाण केली आहे. मारहाण करत असताना त्याच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला. तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने समोरच्या टेबलवर ठेवलेले स्टिलचे कुलूप घेऊन बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याचं दिसतंय. पुढे याच व्यक्तीला दोघांनी ओढत नेल्याचंही सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

अरे पोटात तरी किती घ्यायचं?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच घटनेवर महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी मोथेफीरूंना सज्जड दम दिलाय. अशा प्रकारचं कृत्य कोणीही केलं तर त्याला मकोका लावण्यासाठी मी मागे-पुढे पाहणार नाही. अशा घटना घडल्या की मला मुंबईतून फोन येतात. दादा एवढ्यावर पोटात घ्या, अशी विनंती केली जाते. पण अरे पोटात तरी किती घ्यायचे? सांगणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतला. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कठोर पावले उचलले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालाच्या मागे झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलीस तपासातून नेमकं काय समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणातील गुन्हेगाारंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.