AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू

प्रशांत डिंगणकर यांच्या मनबाधा या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गीतकार कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी केलेल्या भाषणाचा सारांश जाणून घेऊयात.

'मनबाधा' चिरंतराची एक अथक जखम... प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू
ManbadhaImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 09, 2026 | 8:04 PM
Share

प्रशांत डिंगणकर यांच्या मनबाधा या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच राज्याचे सांस्कृतीक मंत्री ॲड आशिष शेलार यांच्यासह, डॉ. महेश केळुसकर यांच्या उपस्थित गीतकार कवी प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. प्रवीण दवणे यांनी केलेल्या लालित्यपूर्ण भाषणाचा संपादीत अंश..

करुणेचा शोध घेणारे पुस्तक प्रा. प्रवीण दवणे

कृष्णाचे रुपडे, डोंगर जाहले निळे,

गोपाळ सावळे दिसतात

या संत जोगा परमानंद यांच्या ओळी मला मनबाधा वाचताना आपोआप मला स्मरून गेल्या, किंवा स्पर्शून गेल्या. राधा म्‍हणजे भेट किंवा मिलन एवढेच नाही तर मुळातच कुठल्या काळातली ती नेमकी, त्याचाही ही शोध लागलेला नाही. अशी ही भाववृत्ती राधा. या राधेची एक आगळी वेगळी मनबाधा, चिरंतराची एक अथक जखम, माझे विद्यार्थी मित्र प्रशांत डिंगणकर यांना ती बाधा जडली आहे. अशा या मनबाधेचे एक ललित बंधात अतिशय उत्कट अस रूपांतर झालं आणि या साहित्यिक, सांस्कृतिक मंचावर त्याचे प्रकाशन होते आहे.

हे पुस्तक हलकं फुलक नाही. जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा, मी लगेचच पहिल्या लेखानंतरच दूरध्वनीवरून प्रशांतजीना निरोप दिला, मला मनबाधा जडू लागली आहे. याचं कारण चविष्ट कादंबरी सारखं पटापट उरकण्याच हे पुस्तक नाही. आकाराने छोटे असेल पण कविता जशी शब्दांच्या संख्येने मोजायची नसते तशी शब्दाच्या आत शिरून आशयाचा परीघ शोधावा, असाच हा ललित एक संग्रह आहे. आणि म्हणूनच मला अस्वस्थ करणार असं हे लेखन आहे.

म्हणजे एखादी कोटी नुसती करायची झाली तर या लेखनातून प्रशांत डिंगणकर मला अशांत डिंगणकर अधिक वाटतात. मला असं वाटतं की, ती अशांतता असल्याशिवाय अशा तरीची मनबाधा होत नाही. कारण वरवरच सुखवस्तू जाता जाता भेळेचा शेंगदाणा उचलावा अशा प्रकारच लेखन लिहिल जाते आणि ते खपाच्या दृष्टीने लोकप्रिय होते. पण मला हे वाचताना जे जाणवलं ते म्हणजे एक खपणार लेखन असतं आणि खपून केलेल लेखन असतं. त्यासाठी वेगळं मूल्य मोजाव लागत .

ही बाधा कितीतरी वर्षा आधीच लेखकांच्या मनाला जडसलेली असणार. अस्वस्थ केलेली असणार. या लेखनात जे सूत्र घेतले किंवा एका अर्थाने अगदी वेगळ्या प्रकारे सांगायचं झालं तर लेखकांने निवेदक निवडलेले हा एक वेगळा निराळा, कदाचित लेखकाच्या मनात नसलेला विचार असेल. कारण आता लेखकांच्या हातात ते पुस्तक राहिलेल नाही. ते आमच्याकडे गेले आहे. पंचतत्वांचा उल्लेख जसा आहे तसेचा षडंरीपुंचा ही उल्लेख आहे. एका प्रकरणात लेखक प्रश्न या विषयावर लिहिले तत्व या विषयावर लिहिले. मी तर असं म्हणतो की, पृथ्वी काय, वायू काय किंवा हे जे पंचमहाभूत आहेत हे एका अर्थाने सूत्र रूपाने निवेदक म्हणून आलेले आहेत. वाचताना जाणवत नाही. वाचताना संवाद स्वतःशी आहे. वाचताना तो नसलेल्या राधेशी आहे. वाचताना तो नसलेल्या कृष्णाशी आहे. पण तरीही अनेकदा ते मूळ जे तत्व आहे त्या तत्वाच सूत्र घेऊन आपल्याला ती राधा शोधायला लेखक भाग पाडतात.

या लेखातील दोन ओळीत असे म्हटले की, प्रत्येकाच्या मनात एक राधा असते.. व्यक्त.. अव्यक्त.. सत्यात, कल्पनेत, वास्तवात, अवास्तवात पण असतेच ती. हे मी वाचलं आणि मला कसे संदर्भ जुळत जातात बघा की मला कवयत्री इंदिरा संतांची “मृणमय” कविता आठवली. मृणमयी मध्ये ती, पृथ्वी तत्वातून व्यक्त झालेली आणि अवकाश रूपातल्या अथांग प्रियकराला भेटू पाहणारी आणि ते भेटता भेटता स्वतः विरून जाणारी अशी मृणमय इंदिरा संतांनी तेव्हा व्यक्त केली होती. या कवितेत इंदिराबाईंन म्हटले आहे की, मातीचे मम अधुरे जीवन.. ही राधेची शोकांतिका आहे. ही राधेची जशी शोकांतिका आहे त्याप्रमाणे ही राधेची सुखात्मिका पण आहे. कारण ती जखम असणं हेही भाग्य आणि ते जखम न भरण हे सुद्धा सृजनासाठी भाग्य असते.

एकदा का त्या लेखक नावाच्या, कवी नावाच्या, कलावंत नावाच्या मनाची अश्वत्थाम्याची जखम वाळली की मग नुसती लेखणी वर निळी ओली असते पण वरच्या निळ्या ओल्याची ओल कवितेत उतरत नाही. म्हणूनच ती अस्वस्थता प्रशांत डिंगणकर यांच्या अनेक लेखनातून येते आणि त्याचं या ठिकाणी स्वागत होते. हे पुस्तक वाचताना आनंद होत नाही. हे आनंद न होणं हीच मुळात या लेखनांची श्रीमंती आहे. हे पुस्तक वाचून, वाचक असं म्हणणार नाही की, वा छान सुखावलो.

आपण बोटाच मोरपीस मध्ये ठेवून आपण पृथ्वीतून जाणवणारी, वायुरूपातून जाणवणारी या तत्वरूपातून जाणारी एक वेगळी तीव्र अशी सनातन, चिरंतन अशी सृजन शक्ती आपण नकळतपणे शोधत राहतो. नकळत आपल्या दृष्टी येतात या गोष्टी आपण विचार फारसा केलेला नसतो. म्हणून ही मनबाधा ही एक काळीज बाधा आहे. ही संवेदनेला झालेली जखम आहे .

एका गोष्टीच मी स्वागत करीन, लेखनामध्ये लेखकाने कुठेही ती राधा मला सापडली असा दावा केला नाही. हे मला कळलंय असा आविर्भाव नसल्यामुळेच त्या पाऊलवाटा उलघडायला लागतात. आपण शोधायला लागतो. लेखकाने एका ठिकाणी म्हटले की, ही राधा मला सापडली असा मला दावा नाही आणि उद्या ती तुम्हाला वाचताना तुमची तुम्हाला वेगळ्या रुपात सापडली तरी पण माझी हरकत नाही. ही मुक्तता या लेखनात आहे. म्हणून लेखकांने असं म्हटले की, माझा शोध तुमचा होऊन जाईल. इतक सहजगत्याने वाक्य होतं पण त्यासाठी आपल्याला त्या लेखनाशी अद्वैत व्हावे लागते. आपण त्याच्यामध्ये विरून जाव लागते. हा एक करुणेचा शोध आहे, राधेच्या डोळ्यांनी आपण जग बघू लागायला लागलो की, आपल्याला एकीकडे महोत्सव पण कळतात आणि एकीकडे कंटक पण कळतात.

बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता आहे त्यातल्या दोन ओळी अशा आहेत की,

किती रंगविशी रंग.. रंग भरले डोळ्यात..

मायासाठी श्रीरंग रंग खेळावयात …

विचार करा की, रंग डोळ्यात भरलेत तो श्रीरंग आहे आता बाहेर नाही उरलेला माझ्यात आहे माझे डोळे श्रीरंग पाहत नाहीत माझी दृष्टी श्रीरंग झाली हे जे अद्वैत आहे, त्या बहिणाबाईच्या मधली राधा आहे, इंदिराबाईंच्या मृणमय मधली राधा आहे ही कुठे ना कुठेतरी अशी आपल्याला सावली सारखी ढवलताना दिसते. या लेखनासाठी जी शैली लेखकाने निवडली आहे त्याबद्दल बोलायचे झाले तर, मी कुठल्याही नावाची तुलना करत नाही, क्षमा करा, परंतु ग्रेस यांच्या कवितेतली एक ढब आणि जि. ए कुलकर्णी यांच्या लेखनामधली जी काळोखाच्या गुहेत धावत जाताना जांभळे रंग आपल्यावर पडत जातात असं काहीतरी एक छान मिश्रण या लेखनात जाणवते. ही एक वेगळी शोध यात्रा आहे .

या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, या सगळ्याच्या मुळाशी एक डंक आहे. एक दंश आहे. नुसते प्रश्न नाहीये लेखकाने त्याला प्रश्न म्हटले तो औपचारिक शब्द आहे. पण मला तर नुसता प्रश्न नाहीये प्रश्नांना एकवेळ उत्तर असतं पण डंखान उत्तर नसत. ते आपले आपले असतात. फक्त उशीलाच माहिती असते कवीच्या काळजाच स्पंदन. या पुस्तकात काव्यात्मकता भरलेली आहे. या ठिकाणी त्याचा उल्लेख मुद्दा म्हणून करतो. कुठले कुठले त्याच्यात प्रश्न आहेत, किती साधे आहेत पहा. लेखकाने म्हटले की, पावसाची रिमझिम सुरू झाली मी हिरव्यागार डोंगरांतून, दरीतून ढगांची शाल पांघरून कोण नाचू लागत? इथे ढगांची शाल पांघरून कोण नाचू लागते? इथे मोर हे उत्तर नाही, इंद्रधनुष्य नाही, निसर्ग नाही, वारा नाही या सगळ्या नवनिर्मितीच्या मागे एक जो चालविता धनी, बोलविता धनी, पृथ्वीला संजीवनी देणारा असा जो कोण एक धनी बसलाय तो नाचतो का? तो हा सगळा खेळ खेळतो का? ही शाल डोंगराने कधी दिसते का? रसिकाला दिसते. पण डोंगरांना कधी ती शाल दिसते का? हे डोंगरांच पण दुःख आहे. एक कलावंत म्हणून लेखकाने ते ओळखले आहे.

म्हणून या ठिकाणी ते प्रश्न सुद्धा ललित लेखाच रूप होतात. याच प्रकरणात लेखकाने आजच्या समाजाला लागलेली एक वेगळी बाधा नकळत मांडलली आहे की, माणसाला बुद्धी मिळाली तिथेच गडबड झाली. आता केवळ एका वाक्यावर किती तरी बोलता येईल. पण बुद्धी दिली तिकडे गडबड झाली याचा अर्थ काय पुष्कळदा संवेदनांचा शोध आपण संवेदनेने घेत नाही. आपण मेंदू आणि हृदय याच्या मधलं जे एक जगण्याचं अंतर आहे ते पार न करता सगळेच गुण प्रश्न मेंदूनी शोधण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा अवकाश निसटून जातं. त्यामुळे मनबाधा विशेषतः युवकांनी नव्या लेखकांनी जर आतला रियाज म्हणून वाचले तर मला मला वाटतं की, हे पुस्तक म्हणजे संवेदनांची कार्यशाळा पण होऊ शकते.

बुद्धीचा नुसता विकास होऊन चालत नाही तर हृदयाचा विकास आणि बुद्धीचा विकास एकत्र झाला तर सृजनांचा उत्सव सुरू होतो. या पुस्तकात हृदय आणि बुद्धी याची सांगड घातलेली आहे आणि अशा या हृदय आणि बुद्धीच्या सहाय्यान न गवसणार पण शोधात श्रीमंती आहे अशा तरी एक वेगळी तृष्णा देणारा हा एक वेगळा असा ललितबंद की ज्याला पण कवितेच परिमाण लावावं अशा तरचा श्रीमंत समृद्ध संवेदनांचा असा संग्रह आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचताना मला थोर कवी बा.भ बोरकर यांच्या अनेक कवितेंमध्ये जी निळ्या रंगाची आणि कृष्णाची लयलूट आहे. त्याची आठवण झाली. बोरकर म्हणतात..

तो एक निळाईतला कृष्ण,

ती एक मृण्मयीतील राधा..

तुला मला उमगला जिव्हाळा

जन्मांचा पट फिटला ग

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक