
आमदार माणिकराव कोकाटे यांना अखेर कृषीखातं गमवावं लागलं आहे. सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते अडचणीत आले होते. विरोधी पक्षांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. नशिबाने माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद वाचलं. फक्त खाते बदलावर निभावल गेलं. माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याजागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त खातेबदल केला आहे. दत्तात्रय भरणे यांचं युवक आणि क्रीडा खातं माणिकराव कोकाटेंकडे तर माणिकरावांच कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं.
राज्याचे कृषीमंत्री बनल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी आज टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. “खरंतर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सर्वांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. निश्चित प्रकारे बातमी समल्यावर एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीखातं मिळतं, याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असू शकतो” अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली.
नवीन कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या मुद्यांवर काय म्हणाले?
“या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल? शेतकऱ्यांच्या शेतात नावीन्यपूर्ण उपक्रम कसे राबवता येतील, यावर माझा भविष्यात भर असेल” असं नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कर्जमाफीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, त्याकडे कसं बघता या प्रश्नावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “कृषी विभागाचा अजून मी चार्ज घेतलेला नाही. माहिती घेतलेली नाही. कर्जमाफीचा जो काही विषय असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील”
‘पदभार संभाळल्यानंतर यावर बोलणं उचित ठरेल’
“अजून मी चार्ज घेतलेला नाही. संपूर्ण माहिती घेईन. माहिती घेतल्यावर निश्चित आपल्याशी बोलेनं. माझ्या शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल, प्रश्न कसे सोडवता येतील हा माझा प्रयत्न आहे” असं दत्तात्रय भरणे म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, कृषी खात्यासाठी रोडमॅप काय असेल? या मुद्दावर ते म्हणाले की, “पदभार संभाळल्यानंतर यावर बोलणं उचित ठरेल. माझ्या शेतकरी बांधवासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असेल”