मुंबईला निघण्यापूर्वीच जरांगे पाटलांच्या अडचणी वाढल्या; गुणरत्न सदावर्ते यांची मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईमधील आंदोलनाची घोषणा केली आहे, मराठा बांधव 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत, यावर आता गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबईला निघण्यापूर्वीच जरांगे पाटलांच्या अडचणी वाढल्या; गुणरत्न सदावर्ते यांची मोठी घोषणा
गुणरत्न सदावर्ते यांची मोठी घोषणा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 6:57 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे. दरम्यान उपोषणाच्या 15 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बंधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. येत्या 15 सप्टेंबर रोजी मराठा बांधव हे अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तर हल्लाबोल केलाच आहे, परंतु त्याचबरोबर विरोधी पक्षांवर देखील हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

गणपतीच्या पूर्वसंध्येला मुंबईला धमकी दिली जात आहे. सणासुदीच्या काळात मुंबईवर विघ्न आणलं जात आहे.  मात्र असं असताना देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत मूग गिळून गप्प बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जर विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित रहावं लागलं तर काय करायचं? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

त्यांनी मुद्दाम आंदोलनासाठी गणेशोत्सवाचा काळाच आंदोलनासाठी निवडला आहे. एक जण हिंदू सणाला टार्गेट करून बोलत आहे, आणि बाकीचे सर्वजण मूग गिळून गप्प आहेत.  गणेश भक्तांचा उद्रेक होईल, गणेशभक्त तुम्हाला माफ करणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या लोकांना देखील जनता कधीच माफ करणार नाही, असंही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

जरांगेंमध्ये एवढी ताकद कुठून आली? जिल्हाधिकारी सरकारची भूमिका सांगतात, माझी सर्वपक्षीय लोकांना विनंती आहे, तुम्ही छुपे राजकारण करू नका,  या देशात ब्राह्मण मुख्यमंत्री का नसू शकत नाही का? दोन जन्म झाले तरी जरांगे यांची ही मागणी मान्य होऊ शकत नाही. जरांगे टारगेट ठेऊन येणार आहेत, त्याचे टारगेट मुख्यमंत्र्यांचे घर आहे. 5 नंतर आझाद मैदानात आंदोलन करता येत नाही, जरांगे पाटील देखील आंदोलन करू शकत नाहीत, सगळ्यांसमोर दाखवून दिले पाहिजे, कायद्यासमोर कोणी मोठे नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी न्यायालयात मांडू अशी घोषणाच  यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us