मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची अंतरवालीमधून मोठी घोषणा, वाचा A to Z प्लॅन, कुठे-कुठे मुक्काम?

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबर रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. 19 तारखेपासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात होणार आहे.

मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांची अंतरवालीमधून मोठी घोषणा, वाचा A to Z प्लॅन, कुठे-कुठे मुक्काम?
manoj jarange
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 3:36 PM

मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा कुणबी दाखले रद्द होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे.  दरम्यान त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. या आंदोलनावर आतापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे अखेर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबईमधील आंदोलनाची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आधीच मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता, त्यानंतर आता त्यांनी आपल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा बांधवांचा मोर्चा येत्या 15 तारखेला अंतरवालीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. त्यानंतर 15 तारखेलाच बीडच्या पाटोद्यामध्ये या मोर्चाचा पहिला मुक्काम असणार आहे. त्यानंतर दुसरा मुक्काम हा 16 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे असणार आहे. 17  सप्टेंबर रोजी पुण्यातील हडपसरमध्ये तिसरा मुक्काम असणार आहे. त्यानंतर  चौथा मुक्काम  18 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये असणार आहे, तर 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषणाला सुरुवात होणार आहे.

दरम्यान या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं होतं. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी आपलं हे आंदोलन मागे घेतलं होतं. आता पुन्हा एकदा मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकणार आहे. अद्यापही या आंदोलनावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेलं नाही, आता या आंदोलनावर कधी तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सरकारला आपल्या सर्व मागण्या मान्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं, तसेच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची देखील विनंती केली होती. मात्र या आंदोलनावर तोडगा निघू न शकल्यानं जरांगे यांचं आंदोलन सुरूच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us