तर पुढच्या शनिवार, रविवारी महाराष्ट्रातील एकही मराठा घरी दिसणार नाही; मनोज जरांगे यांनी शिंदे समितीला सुनावले

आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.

तर पुढच्या शनिवार, रविवारी महाराष्ट्रातील एकही मराठा घरी दिसणार नाही; मनोज जरांगे यांनी शिंदे समितीला सुनावले
Jarange patil and Shinde Samiti
| Updated on: Aug 30, 2025 | 3:53 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.

एकही मराठा घरी दिसणार नाही

शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर एकही मराठ्याचं लेकरूबाळ घरी राहणार नाही. महाराष्ट्रातील मराठा घरात दिसणार नाही. अजून सहा सात दिवस हातात आहे. आणखी वेळ गेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी आणि अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या.’

हैद्राबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेट तात्काळ लागू करा

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करा. औंध संस्थांन आणि बॉम्बे गव्हर्नेमेंटच्या गॅझेटला पंधरा वीस दिवस देऊ. पण हैद्राबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेट लागू करायला एक मिनिटहं देणार नाही. 13 महिने दिले. शिंदे समितीने खूप अभ्यास केला. या दोन गॅझेट नुसार मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे. यात वादच नाही आणि तोडच नाही असंही यावेळी जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

बलिदान देणाऱ्यांना नोकरी देत नाही

मनोज जरांगे पाटलांनी शिंदे समितीला म्हटले की, ‘तुमचा काय संबंध आहे या विषयात. ते तुम्हाला पाठवत आहे. बलिदान दिलेल्या लोकांशी खेळता. मी एक मिनिटंही देणार नाही. दोन महिने देणार होतो. आता तेही देत नाही. बलिदान देणाऱ्यांना नोकरी देत नाही आणि निधीही देत नाही. आमदारांच्या सभेला कोटी रुपये उधळता. बलिदान दिलेल्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी ही त्यांचीच घोषणा आहे. तिथे तडजोड नाही. केसेसही सरसकट मागे घ्या. आमच्यावर हल्ला झाला. आम्ही हल्ला केला नाही. पोलीस अधिकाऱ्यांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा. त्यांना बडतर्फ करा.’