
शुक्रवारी बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यांनी यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख अंतरवालीचे दरिंदे पाटील असा केला होता, त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना घणाघात केला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
बीडमध्ये झालेला मेळावा हा ओबीसींचा मोर्चा नव्हता, तर तो एका विशिष्ट जातीचा आणि टोळीचा मोर्चा होता हे सिद्ध झाले आहे. त्यांच्या काही गोष्टी बाहेर पडत आहेत, आपण ओबीसी ओबीसी बोंबलायचं आणि मराठा ओबीसींमध्ये तणाव निर्माण करायचा. त्यातून आपलं मंत्रिपद साधायचं, कारण त्या घुर्रट भुजबळांनीच सांगितलं आहे, मी ओबीसी ओबीसी बोंबललो आणि मला न द्यावे लागलेले मंत्रिपद द्यावे लागले, असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, घुरर्ट छगन भुजबळ यांचे चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे, या षडयंत्रामध्ये एकदा गुंतलं की बाहेर निघता येत नाही, गोरगरीब मराठा लेकरांचं वाटुळं का करावे? असे पंकजा मुंडे यांना वाटले असावे, यापुढे सुधारणा करू असं त्यांना वाटले असेल, त्यामुळे पकंजा मुंडे या मेळाव्याला आल्या नसतील असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान मनोज जरांगे पाटील माझ्या मतदारसंघात आले तरी मी निवडून आलो असा दावा शुक्रवारच्या सभेत छगन भुजबळ यांनी केला होता, त्याला देखील जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मी जर खरच आलो असतो, तर भुजबळ यांच्या धुरा उलाल झाल्या असत्या, आता निवडून आल्यावर बोलत आहेत, पण तेव्हा तर ते मला मित्र आहे म्हणाले होते. तेव्हा म्हणाले जरांगे पाटील मित्र आहेत, आले आणि गेले. पण त्यावेळी मी एका सांत्वन भेटीला गेलो होतो. छगन भुजबळ यांची काही दिवसात वाईट अवस्था होणार आहे, तुटलेल्या चपला, केसांवर फुगे असं काही त्यांच्याकडे दिसेल, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.