‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी त्यांनी आपण पोलिसांना सर्व सहकार्य करणार आहोत. आमचे आंदोलन शांततेत असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरु केले आहे. २९ ऑगस्टपासून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सरकारी धोरणाविरोधात आपण उपोषण करणार अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी उपोषण सुरु आहे. सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पीएचा आपल्याला फोन आला होता. ते उद्या चर्चेला येणार आहेत. आम्ही त्यांना सहकार्य करु, पोलिसांना देखील आमचे संपूर्ण सहकार्य असेल. कायद्याचे पालन आम्ही करु असे मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उशीरा आंतरवाली येथे उपोषणापूर्वी प्रतिक्रीया देताना सांगितले.
मनोज जरांगे यांनी आपले उपोषण सुरु केले आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की उद्या विखे पाटील चर्चेला येणार आहेत. त्यांच्या पीएचा का की कोणाचातरी फोन आला होता. आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत असे सांगितले आहे. पण सरकारच आमच्या उपोषणावर हल्ला करत आहे. आमचे आंदोलन तर शांततेत असणार आहे. आमच्यावर अन्याय केला जातोय. सरकारने काहीही करायचे आणि आम्ही फाशी घ्यायची का असा सवाल यावेळी जरांगे यांनी केला आहे. कायद्याचे पालन आमच्याकडून होणार आहे. गाड्या जास्त येणार आहेत तर ट्रॅफीक जाम होणारच ना ? पण आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
अंबडचे उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी जरांगे पाटील यांना नोटीस दिल्याचे उघडकीस आले आहे. उपोषणादरम्यान वाहतुकीस अडथळा येणार नाही, त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पार्किंग व्यवस्था नियोजित केलेल्या ठिकाणीच करण्यात यावी, उपोषणा दरम्यान ध्वनी प्रदूषण कायदा आणि नियमाचा उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे नोटिशीत पोलिसांनी म्हटले आहे.
पोलीस बळाचा वापर केला तर…
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीशीला जरांगे पाटलांनी लेखी उत्तर सादर करीत इशारा दिला आहे. अंतरवाली येथील आमरण उपोषण हे गेल्या तीन वर्षांपासून लोकशाही मार्गाने शांततेत सुरू आहे, आणि ते शांततेतच सुरू राहणार आहे, मात्र सरकारकडून कायद्याचे उल्लंघन करून मराठा समाजावर पोलीस बळाचा वापर करून हल्ला करणे, तसे प्रकार सरकारने यापूर्वी या आंदोलनावर केलेले आहे, तसा काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सरकार जबाबदार असणार आहे असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.