
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले आहे. सध्या मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांना सरकारने पुन्हा फसवले असल्याचा दावा एका मराठा नेत्याने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करतात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस सुरू असलेले उपोषण मागे घेतले. मात्र सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात दिलेल्या जीआर मध्ये त्रुटी असल्याचं मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी म्हटलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना सरकारने पुन्हा एकदा फसवलं असल्याचा आरोप देखील योगेश केदार यांनी केला आहे.
मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी म्हटले की, सरकारकडून देण्यात आलेल्या जीआरमध्ये स्पष्टता नाही, त्यामुळे या जीआर ला न्यायालयामध्ये चॅलेंज केले जाऊ शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्यासंदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काम यापूर्वीही केले आहे. त्यामुळे आज राज्य सरकारकडून हैदराबाद संदर्भात जीआर देऊन मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे असं योगेश केदार यांनी म्हटलं आहे.
योगेश केदार पुढे म्हणाले की, मराठ्यांनो थोड थांबा, सरकार गडबड करतेय. दादा नी मला जीआर तपासून घेण्याची जबाबदारी मला दिली होती. मी सत्य सांगितले, पण माझे ऐकून घेण्यास कोणी तयार नाही. ज्याच्या मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या जीआर चा फायदा होईल. परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत , त्यांना याचा काहीही फायदा नाही, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.
सोप्या भाषेत ज्यांना शिंदे समिती च्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल. ज्यांच्या गावात , कुळात नोंदी सापडल्याच नाहीत त्यांचे काय ? याची स्पष्टता आणावी लागेल. त्यामुळे या जीआर मध्ये सुधारणा आवश्यक आहेत. त्यात स्पष्टता आणावी आशी विनंती मि दादांच्या कडे करतोय. शेवटी, शेकडो बलिदानाला तसेच मनोज दादांच्या त्यागाला गोड फळ यावे हीच ईच्छा.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे छत्रपती संभाजी नगर शहरात मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला. पुंडलिक नगर भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मराठा बांधनांनी आनंद व्यक्त केला. काही लोकांनी कारच्या छतावर जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फोटो हातात घेत गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यामुळे शिरूर तालुक्यात आनंदाची लाट उसळली आहे. रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद व्यक्त केला. “मराठा क्रांती मोर्चा की जय”, “मनोज जरांगे पाटील अमर राहो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.