
अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर होतो आणि मग रुग्णालयात हमरीतुमरीवर प्रकरण येतं. पंढरपुरात तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच कळसच झाला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला चुकीचं रक्त दिल्याने या महिलेचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर महिलेच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे राहणारी ही महिला आहे. आरती चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. ती प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. यावेळी तिला चुकीचं रक्त पुरवल्या गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्राच्या गंभीर निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
पंढरपुरात संताप
आरती चव्हाण यांना प्रसुतीदरम्यान रक्ताची आवश्यकता भासल्याने कुटुंबीयांकडून रक्त आणण्यात आले होते. मात्र रक्त गट न जुळवता दिलेल्या रक्तामुळे महिलेची प्रकृती अत्यंत बिघडली. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत असून डॉ. गजानन बागल यांचे “स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर” शासनाने तत्काळ बंद केले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने डॉक्टर आणि टेक्निशियनचे जबाब नोंदवले आहेत. या गंभीर प्रकारात अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र आरतीच्या मृत्यूमुळे पंढरपूरात एकच खळबळ माजली आहे.
जटील शस्त्रक्रिया पार पडली, डॉक्टरांचं कौतुक
दरम्यान, एकीकडे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरात खळबळ उडालेली असतानाच सोलापुरातूनच एक चांगली बातमी समोर आली आहे. सोलापुरात दुसऱ्या एका रुग्णालयात अवघ्या 9 महिन्याचे बाळ आणि 91 वर्षीय वृद्धाची अति जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात ही अतिजटील शस्त्रक्रिया पार पडली. कर्नाटकातील अवघ्या 9 महिन्याच्या बाळावर ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’ ही शस्त्रक्रिया पार यशस्वीपणे पार पडली. तर लातूर येथील 91 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर ‘टॅव्ही’ ही अतिजिटल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
9 महिन्याच्या बाळाच्या हृदयाला 4 एम.एम.चे छिद्र होते. त्या बाळावर आंतरराष्ट्रीय पद्धतीची उपकारणे वापरून सोलापुरात पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली, शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धांत गांधी आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी यांनी ही अति जटील शस्त्रक्रिया पार पाडली. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून या शस्त्रक्रियेबद्दल कौतुक करण्यात येत आहे.