
भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. अधिवेशन सुरू असताना आज भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर ही बैठक झाली. या बैठकीसाठी भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीत नेमकी कशावर चर्चा?
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या निवडणुकांबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी मुंबईत विजयी मेळावा झाला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती, त्यामुळे या मेळाव्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीमध्येच लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट होताना दिसत नाहीये, या सर्व पार्श्वभूमीवर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.
मेळाव्यानंतर पहिलीच बैठक
दरम्यान सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला हजेरी लावली, त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबतच्या चर्चेनं जोर धरला आहे. हा मेळावा झाल्यानंतर पहिल्यांदाच वर्षावर आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर देखील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे, या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.