छत्रपती घराण्याच्या नावाचा वापर करून कधीही मते मागितली नाहीत, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अंकुश कदम यांना प्रत्युत्तर
छत्रपती घराण्याच्या नावाचा वापर करून कधीही मते मागितली नाहीत, आपण कामाच्या जोरावरच निवडून आलो आहोत असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

“मी छत्रपतींचा वारस आहे म्हणून मला निवडून द्या, असे मी आजवर लढलेल्या चारही निवडणुकांमध्ये कधीही म्हटलेले नाही. मला माझ्या घराण्याचा सार्थ अभिमान आहे, मात्र राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी मी कधीही घराण्याच्या नावाचा वापर केलेला नाही, तर माझ्या कामाच्या जोरावरच मते मागितली आहेत,” अशा शब्दांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘छत्रपती घराण्याची कवच कुंडले काढून निवडणुकीत उतरा’ या शिवसेना प्रवक्ते अंकुश कदम यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
जनतेच्या मनात राजघराण्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा आहेच, पण ज्यांच्याकडे स्वतःचे असे काहीच सांगण्यासारखे नाही आणि ज्यांना आरोप करता येत नाहीत, तेच लोक पळवाट काढण्यासाठी आणि शब्दांचा खेळ करून महाराज आणि सामान्य जनता अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच, निवडणुका आल्यावरच विरोधकांचा ‘जावळीचा स्वाभिमान’ कसा जागा होतो आणि इतर वेळी तो मुंबईला का निघून जातो? असा खोचक सवालही शिवेंद्रराजे यांनी यावेळी केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांचे पुन्हा उत्तर
राजकीय टीका किंवा प्रश्नांपासून वाचण्यासाठी ‘छत्रपती’ या शब्दाचा किंवा गादीचा ‘कवच-कुंडले’ म्हणून वापर करू नये. आपण आता लोकशाहीत आहोत असे आपण म्हटले होते असे शिवसेनेचे प्रवक्ते अंकुश कदम यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की तुम्ही जनतेतून निवडून येत १५ वर्षे आमदार राहिलात आणि आता राज्याचे मंत्री आहात.निवडणुका लढवताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतच असतात. विचारलेले प्रश्न हे छत्रपतींच्या गादीला नसून जावळीच्या आमदाराला, राज्याच्या मंत्र्याला आणि एका लोकप्रतिनिधीला विचारले आहेत. स्वतःची पापे लपवण्यासाठी जाणीवपूर्वक ‘छत्रपतींचा अपमान झाला’ असा कांगावा करून छत्रपतींच्या नावाला बदनाम करू नका असेही कदम यांनी म्हटले आहे.