मीरा-भाईंदरप्रकरणी मोठा ट्वीट, भाजपवर नाराज असलेल्या बड्या नेत्याचा थेट मनसेत प्रवेश
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी दुकानदारावर झालेल्या मारहाणीमुळे निर्माण झालेल्या वादात मनसे आणि भाजप आमनेसामने आले आहेत. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसेने भाजपवर आरोप केले, तर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेत प्रवेश केला आहे

सध्या मराठी विरुद्ध अमराठी हा वाद विकोपाला गेला आहे. त्यातच मिरा-भाईंदर परिसरात एका अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत मनसेच्या कृतीचा निषेध केला. त्यातच आता भाजपच्या एका नाराज पदाधिकाऱ्याने थेट मनसेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
मीरा भाईंदरमध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. ज्या दुकानदाराला मारहाण झाली, त्याने हा वाद मिटवण्याची तयारी दाखवली होती. मात्र, भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावला, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.
मिरारोडमध्ये बंद पाळण्यात आलेला भाग लहानसा होता. फक्त २५ ते ५० व्यापारी यात सहभागी झाले होते. आजचे आंदोलन व्यापाऱ्यांचे नसून भाजपच्या लोकांचे होते. भाजपमधील येथील नेते, पदाधिकारी, वकील आणि नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोकांनी मिळून हे आंदोलन केले. हे भाजपने मराठी माणसाविरोधात केलेले आंदोलन आहे. या मारहाणीचा फक्त ४० सेकंदांचा व्हिडिओ भाजपने व्हायरल केला. जो कट केलेला होता. त्यामागे-पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. परंतु भाजपने राजकीय फायद्यासाठी तोच भाग सोशल मीडियावर शेअर केला, असा आरोपही अविनाश जाधव यांनी केला.
भाजप पुरस्कृत मोर्च्यावर नाराजी
या सगळ्या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेत प्रवेश केला. मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप पुरस्कृत मोर्च्यावर नाराजी व्यक्त केली.
आज मीरा-भायंदर येथे झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्च्यावर नाराजी व्यक्त करत, तसेच स्थानिक भाजप आमदारांवर तीव्र रोष व्यक्त करत पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.#मराठी #महाराष्ट्र… pic.twitter.com/v7X7WuzEvD
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 3, 2025
मीरा-भाईंदरमधील राजकीय समीकरणे बदलणार
“आज मीरा-भाईंदर येथे झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्च्यावर नाराजी व्यक्त करत, तसेच स्थानिक भाजप आमदारांवर तीव्र रोष व्यक्त करत पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.” असे मनसेने त्यांच्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
