
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, दोन दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली. अखेर आज त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे.
एकीकडे सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला नाशिकमधूनच विरोध होत आहे. भाजप आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे, त्यामुळे सुधाकर बडगुजर यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाल्या सीमा हिरे?
मी 2014 आणि 2024 दोन्ही वेळेला त्यांच्याविरोधात निवडणूक लढले, या निवडणुकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. बडगुजर यांनी भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊला फिरण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांचे फोटो चुकीचे जोडून त्यांनी कॅसिनो खेळला असं सांगत त्यांच्या बदनामीचा प्रयत्न केला.
आमचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कुठला तरी गुन्हा नाशिकमध्ये दाखल केला, नाशिक पोलिसांनी त्यांना जेवत्या ताटावरून उठवलं, बडगुजर यांची प्रतिमा खूप मलिन आहे. निवडणुकीच्या काळात खूप मुद्दे समोर आले. देशद्रोही सलीम कुत्ता याच्यासोबत नाचताना त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांच्यावर आतापर्यंत 17 गुन्हे दाखल झाले आहेत, हे गुन्हे कुठे तरी लपवायचे आहेत, त्यासाठी कदाचित ते भाजपमध्ये येण्यास इच्छूक असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यावर कारवाई तर होणारच आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल की भाजपमध्ये प्रवेश करू, असं हिरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान हिरे यांच्याकडून बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होत असल्यानं आता ते काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे?