
Kalyan Video : कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला परप्रांतीयांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी पीडित तरुणीला जमिनीवर आदळताना दिसतोय तसेच तिला फरफटत ओढत असल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या आरोपीचा हात फक्त सापडायला हवेत, असे आश्वासनही जाधव यांनी पीडित तरुणीला दिले. दरम्यान, मनसेच्या भूमिकेनंतर आता तो तरुण सापडल्यावर मनसे काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेत तिच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी रुग्णालयात नेमकं काय झालं? याची सविस्तर माहिती तरुणीने अविनाश जाधव यांना दिली. घडलेला प्रकार ऐकून घेतल्यानंतर अविनाश जाधवांनी पीडित तरुणीशी संवाद साधला. ताई तुला आज सांगतो. आम्ही तुझा बदला घेणार. ज्या हातांनी तुला मारलं त्याच हातांचा आम्ही बंदोबस्त करणार. तसेच तो तरुण आम्हाला सापडावा हीच अपेक्षा आहे. एक तर त्याला पोलिसांनी शोधावं नाहीतर आम्ही त्याचा शोध घेतो. आम्ही तुला आता रुग्णालयात दाखल करतो. तुझ्या उपचाराचा जो काही खर्च होईल तो आम्ही मनसे पक्षातर्फे करू, असे आश्वासनही मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कल्याणमधील त्यात तरुणीला दिले.
तसेच तुला आमच्याकडून आणखी काही मदत हवी आहे का? असा सवालही अविनाश जाधव यांनी त्या तरुणीला केला. त्यावर बोलताना मला काहीही नको आहे. फक्त जशी माझ्यावर परिस्थिती आली, तशी अन्य कोणावरही ओढवू नये. त्याने आणखी कोणालाही असा त्रास देऊ नये अशी माझी अपेक्षा आहे, अशा भावना या तरुणीने बोलून दाखवल्या.
या तरुणीला मारहाण झालेला व्हिडीओ राज ठाकरे यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण झालेल्या तरुणीला पाहायला जा. तिच्या प्रकृतीची विचारपूस करा, असा आम्हाला आदेश दिला. त्यानंतर मी इथे आलो आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. तसेच या तरुणीला एवढी मारहाण झालेली आहे. ती बचावली हीच फार मोठी बाब आहे, असं बोलत जाधव यांनी तरुणीला अमानुष मारहाण झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.