
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले महाजन?
‘मुख्यमंत्री स्वतःहून भेटले काय? आणि राज ठाकरे स्वतःहून भेटले काय? त्यात फरक काय आहे. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि राज ठाकरे हे राज ठाकरेच राहणार आहेत. शब्दाचा छळ करून, आपली निष्ठा दाखवण्यासाठी दोन माणसांनामध्ये कशाला ओढता? असा सवाल यावेळी प्रकाश महाजन यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महंमद पर्वताला भेटला काय ? पर्वत महंमदला भेटला काय? महत्वाचे हेच आहे की भेट झाली. मुख्यमंत्री स्वतःहून भेटले तरी ते मुख्यमंत्रीच राहणार आहेत, आणि राज ठाकरे स्वतःहून भेटले तरी ते राज ठाकरेच राहणार आहेत, त्यांच्यात काय बदल होणार आहे? राऊत यांचे बोलणे हे शाळेतील पोरासारखे आहे, कोण आधी कोणाला भेटले? संजय राऊत यांनी मावळ अपघात झाला त्याच्याविषयी बोलायचे सोडून, कोण कोणाला भेटले असे बोलणे म्हणजे पोरखेळ आहे? असा घणाघात यावेळी महाजन यांनी केला आहे.
सुमार कुवतीची लोक असले की असं होत असतं. संजय राऊत हे मोठे आणि अनुभवी नेते आहेत, मी त्यांना काय बोलावे? संजय राऊत यांनी दोन महिने गप्प राहिले तर, या महाराष्ट्राचे खूप चांगले होईल. मुख्यमंत्र्यांनी गुप्त बैठक घेतली, हे संजय राऊत कोणत्या आधारावर म्हणतात? मुख्यमंत्री कुठून निघाले कुठे आले याच्या सर्व नोंदी असतात. संजय राऊत यांना वाटत असेल की, बिल्डर हे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांना भेटले तर त्यांनी नावे जाहीर करावीत. महाराष्ट्रात काही चांगले घडायचे असेल तर त्यावेळी संजय राऊत असे बोलून जातात की सर्व बिघडून जाते, माझी संजय राऊत यांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी दोन महिने मौन बाळगावे महाराष्ट्रात खूप चांगले घडेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.