‘महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे’, व्हिएतनामच्या राजधानीत फडकला ठाकरे बंधूंचा बॅनर

राज ठाकरेंचा पक्ष मनसे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. अशातच आता व्हिएतनामची राजधानी हनोई येथील महाराष्ट्रीयन नागरिकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त बॅनर झळकावला आहे.

महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, व्हिएतनामच्या राजधानीत फडकला ठाकरे बंधूंचा बॅनर
MNS Shivsena Alliance
| Updated on: Jun 15, 2025 | 8:29 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचा पक्ष मनसे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. दोन्ही पक्षांकडून याबाबत संकेत मिळाले आहेत. अशातच आता व्हिएतनामची राजधानी हनोई येथील महाराष्ट्रीयन नागरिकांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त बॅनर झळकावला. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख रोहिदास मुंडे यांनी हा बॅनर फडकवून एक आगळा संदेश दिला आहे.

महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे

व्हिएतनामची राजधानी हनोई येथील हा बॅनर केवळ दोन नेत्यांची छायाचित्रे नव्हती, तर ती एक भावना होती- एकतेची, बंधुभावाची आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची. व्हिएतनाममधील तसेच जगभरातील मराठी माणसांचे हे आवाहन आहे की महाराष्ट्रात दोन प्रभावशाली नेते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे.

देशातील नागरिक ज्या प्रकारे या एकतेची अपेक्षा बाळगून आहेत, त्याचप्रमाणे परदेशातील मराठी बांधवही भावनिकरित्या आपल्या मातृभूमीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या मते, आजच्या काळात महाराष्ट्राला स्पष्ट दिशा, विकासाभिमुख नेतृत्व आणि मराठी अस्मितेचा बुलंद आवाज आवश्यक आहे, जो केवळ ठाकरे बंधूंनी मिळूनच शक्य आहे.

ही घटना एक उदाहरण आहे की, मराठी अस्मिता ही केवळ राज्यापुरती मर्यादित नाही, तर तिचे प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटत आहे. “मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत; राजकारणात भिन्नता असली तरी महाराष्ट्रासाठी एकवाक्यता हवी.” असा विश्वास या उपक्रमामागे असलेल्या स्थानिक मराठी संघटनांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र येतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीआधी युती होण्याची शक्यता

मनसे आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत सकारात्मक चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती करणे दोन्ही पक्षांच्या हिताचे ठरु शकते.