
मोठी बातमी समोर येत आहे, उद्यापासून इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराला सुरुवात होणार आहे. मनसेच्या वतीनं इगतपुरीमध्ये तीन दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. इगतपुरी येथील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मनसेचं हे तीन दिवसीय शिबिर पार पडणार आहे. या शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये 70 पेक्षा अधिक रूम बुक करण्यात आल्या आहेत.
मनसेच्या वतीनं जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी या तीन दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना सोडण्या अगोदर राज ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे शिबिर घेतलं होतं, त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता इगतपुरीमध्ये मनसेच्या वतीनं तीन दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या शिबिरामध्ये राज ठाकरे काय बोलणार? काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विजयी मेळाव्यानंतर पहिलंच शिबिर
राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली, मनसेनं रस्त्यावर उतरल आंदोलन उभारलं, त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली.
अखेर सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला, सोबतच नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना देखील करण्यात आली. दरम्यान सरकारने जीआर रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला होता. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा रंगली.
आता या सर्व पार्श्वभूमीवर मनसेच्या इगतपुरी येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या शिबिराकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. या शिबिरामध्ये राज ठाकरे काय बोलणार? काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.