प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एसटीचं पुढचं पाऊल, बसस्थानकांवर अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक झळकणार

| Updated on: Mar 23, 2023 | 1:33 PM

पूर्वी एसटी चालकाच्या मागील बाजूस त्या आगारातील आगार व्यवस्थापक व बसस्थानकांवरील चौकशी खिडकीतील दुरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले जात होते. ती प्रथा नंतर बंद झाली. आता एसटीच्या मुंबई विभागाने नवीन प्रयोग केला आहे.

प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एसटीचं पुढचं पाऊल, बसस्थानकांवर अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक झळकणार
MSRTC
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : एसटी महामंडळाने ( MSRTC ) आता प्रवाशांची तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. गाड्या कधी येणार किंवा इतर कोणत्या तक्रारी करायच्या असतील तर आता संबंधित जबाबदार अधिकाऱ्याचे मोबाईल क्रमांक ( MOBILE  NO.) बसस्थानकातील तक्त्यांवर टळक अक्षरांत लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरूवात मुंबई विभागापासून करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना त्यांच्या प्रत्येक तक्रारी छडा लावता येणार आहे.

एसटी महामंडळ कोरोना संकटानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना पन्नास टक्के सवलत यामुळे प्रवासी संख्या वाढत आहे. परंतू एसटी संदर्भातील तक्रारी ऐकण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. एसटी महामंडळाची राज्यभरात 580 पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. यापैकी अनेक बसस्थानकांवरील चौकशी खिडकीतील दूरध्वनी बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत.

एसटीच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पुढाकार घेतला आहे, मुंबई विभागाने आपल्या प्रत्येक बस स्थानकावर ते बस स्थानक ज्या आगाराच्या कार्यकक्षेत येते, त्या आगारातील आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख, वाहतूक नियंत्रक आदींचे मोबाईल क्रमांक असलेला तक्ता प्रदर्शित केला आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावरील अडीअडचणी, तक्रारी यांचे निरसन जागच्या जागी होऊन त्यांना तातडीने मदत मिळणार आहे.

एसटीचे कॉल सेंटर ठप्प

एसटी महामंडळाने साल 2018-19 मध्ये मोठा गाजावाजा करून प्रवाशांच्या तक्रारी – सूचना ऐकण्यासाठी  एका खाजगी संस्थेच्या मदतीने कॉल सेंटर सुरू केले होते. या कॉल सेंटरवर संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत होते. परंतु या कॉल सेंटर वरील माहिती देणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना एसटी बद्दल माहिती नसल्याने ते प्रवाशांच्या तक्रारींचे नीटसे निरासरण करू शकत नव्हते. त्यामुळे एका वर्षात हे कॉल सेंटर बंद पडले. सध्या 1800221250  हा टोल फ्री क्रमांक सुरू आहे. परंतु हा टोल फ्री क्रमांक सतत बिझीच लागत असतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांपूर्वी तत्कालिन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निर्देशानुसार एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी एक परिपत्रक काढून प्रत्येक बस स्थानकांवर व बसेसमध्ये संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांचे व स्थानक प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याच्या सूचना केल्या होत्या.

पुणे बस स्थानकाने केली सुरूवात

मुंबई विभागातील प्रत्येक बस स्थानकावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केल्याने बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी तेथील अधिकारी 24 तास उपलब्ध राहतील, असा संदेश या उपक्रमातून मिळत आहे. अशा प्रकारचा उपक्रम काही महिन्यापूर्वी पुणे विभागाने सुरू केला होता. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावरील 80 टक्के तक्रारी त्यामुळे बंद झाल्या. हा उपक्रम एसटीच्या प्रत्येक बसस्थानकांवर सुरू व्हावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.