
आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेचा दसरा मेळावा पार पडला. नागपुरातील रेशमबाग मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या मुख्य कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर होण्याचे आणि देशाच्या सुरक्षेसाठी सजग राहण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवे टॅरिफ धोरण, पहलगाम, Gen Z च्या आंदोलनवरुन भाषणात मत मांडली. यावेळी मोहन भागवत यांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे म्हटले. अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणासारख्या जागतिक धोरणांमुळे सर्वांना फटका बसत आहे आपण एकटे जगू शकत नाही, म्हणून जगात परस्पर संबंध आवश्यक आहेत. मात्र, ही निर्भरता मजबुरी असू नये. आंतरराष्ट्रीय जगाशी जुळणे आपल्या इच्छेने झाले पाहिजे. स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही, कारण सध्याच्या अर्थप्रणालीत दोष आहेत, ज्यामुळे श्रीमंती-गरीबी वाढते आणि शोषणाचे नवीन तंत्र तयार होते, असे मोहन भागवत म्हणाले.
पहलगामसारख्या हल्ल्यांमध्ये निष्पाप लोकांची हत्या झाली, यावरही त्यांनी भाष्य केले. काही महिन्यांपूर्वी पहलगामसारखी दुर्घटना झाली. धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या झाली. या घटनेनंतर सेना आणि सरकारने ठामपणे उत्तर दिले. ज्यामुळे नेतृत्वाची दृढता दिसून आली. आपण सर्वांशी मैत्री ठेवावी, पण आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला समर्थ आणि सजग राहणे आवश्यक आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
तसेच शेजारच्या देशांमध्ये होणाऱ्या गोंधळाबद्दल आणि Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवत यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. प्रशासन जनतेला विचारात न घेता धोरणे आखते, तेव्हा असंतोष निर्माण होतो. मात्र, असंतोषाची अभिव्यक्ती हिंसेच्या स्वरूपात होणे योग्य नाही. लोकशाही पद्धतीने बदल घडवता येतो, असे त्यांनी सांगितले. आज निसर्गाचा कोप वाढला असून, डोंगररागांमध्ये त्याचे परिणाम दिसत आहेत. हिमालय ही आपल्या सुरक्षेची भिंत आहे, पण आज हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे, याकडे लक्ष द्यायला हवं, असे विधान मोहन भागवत यांनी केले.
यंदाचे वर्ष श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या बलिदान वर्षाचे आहे. अन्याय आणि अत्याचारातून समाजाला मुक्ती देण्यासाठी हिंद की चादर बनून बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तीचे या वर्षात स्मरण केले जाईल, असे मोहन भागवत म्हणाले. त्यासोबतच यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या योगदानावरही भाष्य केले. आज गांधी जयंती देखील आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाची व्यवस्था कशी असावी याबद्दल विचार देणाऱ्यांमध्ये गांधीजींचे योगदान अविस्मरणीय आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
यावेळी मोहन भागवत यांनी देशातील सध्याच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. सध्याच्या आर्थिक सिस्टीममध्ये काही कमी आहेत. यामुळे देशात श्रीमंती आणि गरिबी या दोन समाजात मोठी दरी निर्माण होत आहे, असे विधान मोहन भागवत यांनी केले.
यावेळी मोहन भागवत यांनी देशात शोषणाचे एक नवे चक्र निर्माण झाले आहे, असे विधान केले. सध्या अर्थव्यवस्थेत काही मोजक्या लोकांचाच ताबा आहे. यामुळेच देशात गरीब लोक अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत. याच चुकांमुळे देशात शोषणाचे एक नवे चक्र तयार होत आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले.