Kolhapur North by-election: कोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे एक हजाराची लाच?, ईडीकडे तक्रार करणार: चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 03, 2022 | 5:52 PM

कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत.

Kolhapur North by-election: कोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे एक हजाराची लाच?, ईडीकडे तक्रार करणार: चंद्रकांत पाटील
कोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे एक हजाराची लाच?, ईडीकडे तक्रार करणार: चंद्रकांत पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North by-election) पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे. शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संशय व्यक्त केला. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील दारू दुकानदारांची बैठक घेऊन काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. परंतु, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंडे, फडणवीस, आठवले कोल्हापुरात

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गती आली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार 4 व 6 एप्रिल रोजी प्रचारात भाग घेतील. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे 6 एप्रिल रोजी प्रचार करतील. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर 7 एप्रिल रोजी सभांना संबोधित करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे 9 व 10 एप्रिल रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी येतील. याखेरीज पक्षाचे अनेक नेते मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

तर अजानचा सन्मान करू

बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे. देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदू म्हणजे बुरसटलेले, असे देशात सातत्याने पुस्तके, शिक्षण व भाषणातून मांडले गेले. जातीय तेढ निर्माण होऊ नये हे केवळ हिंदूनी सांभाळले पाहिजे असे झाले. पण सर्वधर्मसमभाव म्हणजे केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा पण हिंदूंचा सन्मान करायचा नाही, असे चालणार नाही. तुम्ही आमच्या आरतीचा सन्मान करा, आम्ही तुमच्या अजानचा सन्मान करू. आपण एकत्र प्रेमाने राहू. पण सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

राज यांचे भाषण सुखावणारे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या भाषणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Speech : ये रिश्ते टूट जायेंगे तो भारत टूट जायेगा, अबू आझमींचं राज ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर

Jitendra Awhad on Raj Thackeray: मदरश्यात दाढीचा वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, उद्या चौकशीला हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?