Monsoon : पुढील 48 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात काही दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. अधून मधून हलका पाऊस पडत असला तरी मुसळधार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत देखील पावसाने दडी मारल्याने मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. हवामान खात्याने पुढच्या ४८ तासात काही भागांना यलो अलर्ट दिला आहे.

Monsoon : पुढील 48 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता
| Updated on: Jun 18, 2024 | 3:36 PM

Rain Update : उत्तर भारतात उष्ण वातावरण आहे. मान्सूनची प्रतीक्षा वाढत आहे. यूपी-बिहार, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. बहुतांश ठिकाणी अजूनही तापमान ४५ अंशांच्या जवळपास आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लोकं हैराण झाली असतानाच आता. येत्या २४ तासांत उत्तर भारतात उष्णतेची लाट कमी होईल असा अंदाज आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की पुढील दोन दिवस सर्व हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे.

मुंबईत पावसाची दडी

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होतांंना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबईत मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईत पावसाने दडी मारल्याने उष्णतेपासून अजूनही दिलासा मिळालेला नाही. आता हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे.

ठाणे आणि पालघरमध्ये 19 जूनपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रावर मान्सूनचे वारे वाहत असल्याने मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ४८ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

इतर राज्यांमध्ये पावसाची शक्यता

पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये देखील पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल.

18-21 जून दरम्यान गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल येथे पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर भारताबद्दल बोलायचे झाले तर १८ ते २० जून दरम्यान जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या काही भागात १८ ते २२ जून दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.