
मे महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सध्या ब्रेक घेतला आहे. राज्यातील अनेक भागांत शेतकरी मान्सून सक्रीय होण्याची वाट पाहत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तेरकडील जिल्ह्यात मान्सून अद्याप दाखल झाला नाही. हवामान विभागाने मान्सूनसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. १३ जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. तसेच राज्यातील काही भागांत ९ आणि १० जून रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे.
राज्यातील कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसह घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा कायम आहे. यामुळे सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व घाट विभाग, अहिल्यानगर, कोल्हापूर व घाट विभाग, सातारा व घाट विभाग, तसेच सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० वादळी वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये आज दिवस अखेर एकूण ५.४७ टीएमसी १८.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीत ४.४२ टीएमसी म्हणजे १५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीत एक टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. ही दिलासादायक बाब आहे. एक जूनपासून येथे एकूण ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.