भुसे बदनामी खटल्यात खासदार राऊत पुन्हा गैरहजर, कोर्टाचे 2 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुसानीच्या खटल्यात मराठा आंदोलनाचे कारण देत खासदार संजय राऊत आज पुन्हा कोर्टात गैरहजर राहीले. कोर्टाने त्यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट बजावत येत्या 2 डिसेंबरला हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत.

भुसे बदनामी खटल्यात खासदार राऊत पुन्हा गैरहजर, कोर्टाचे 2 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश
sanjay raut and dada bhuse
Image Credit source: socialmedia
| Updated on: Nov 04, 2023 | 3:44 PM

मनोहर शेवाळे, मालेगाव | 4 नोव्हेंबर 2023 : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत मराठा आंदोलनाचे कारण देत कोर्टाच्या तारखेला हजर राहिले नाहीत. यासंदर्भात राऊत यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तसेच राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट बजावत त्यांना येत्या 2 डिसेंबरला पुन्हा हजर रहाण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्या प्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुसानीच्या खटल्यात मराठा आंदोलनाचे कारण देत खासदार संजय राऊत आज पुन्हा कोर्टात गैरहजर राहीले. संजय राऊत यांच्या वतीने ॲड.मधुकर काळे यांनी राऊत यांना पुढील तारीख मिळण्यासाठी मालेगाव अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. कोर्टाने हा अर्ज आज फेटाळून लावला. आणि त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट बजावत त्यांना 2 डिसेंबरला कोर्टात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या वतीने ॲड.सुधीर अक्कर यांनी तर खा.राऊत यांच्या वतीने ॲड.मधुकर काळे यांनी काम पाहीले.

तर अजामिनपात्र वॉरंट बजावणार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे गावबंदी करण्यात आल्यामुळे न्यायालात हजर रहाणे शक्य नसल्याचा अर्ज संजय राऊत यांनी कोर्टात सादर केला होता. मात्र हा अर्ज नामंजूर करीत राऊत यांच्या विरोधात कोर्टाने जामीनपात्र वॉरट काढले आहे. तसेच कोर्टाच्या पुढील तारखेला हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. या आधी 23 ऑक्टोबर संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी दसरा मेळावा असल्याने गैरहजर रहाण्याची परवानगी देण्यात यावी असा विनंती अर्ज राऊत यांनी केला होता. त्यामुळे आज ( 4 नोव्हेंबर ) त्यांना कोर्टात हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू आजही ते कोर्टात हजर राहीले नाहीत.