महायुतीत नवा वाद, एकनाथ शिंदेंवर आरोप करताच श्रीकांत शिंदेंचं खुलं आव्हान, म्हणाले हिंमत असेल तर…

गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनीही नाईक यांच्यावर पलटवार केला आहे.

महायुतीत नवा वाद, एकनाथ शिंदेंवर आरोप करताच श्रीकांत शिंदेंचं खुलं आव्हान, म्हणाले हिंमत असेल तर...
ganesh naik and shrikant shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2026 | 2:54 PM

भाजपाचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आमच्याच सरकारच्या नगरविकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे. गप्प राहण्यासाठी मी मंत्रिपद स्वीकारलेले नाही. नवी मुंबईकरांचे भूखंड परत करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते गणेश नाईक यांच्यावर टीका करत आहेत. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर पलटवार केला आहे.

गणेश नाईक यांना स्मृतीभंश झालेला आहे

यांच्या घरामध्येच दोन मुलं आणि स्वत: माझी झालेले आहेत. त्यांनी मला किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी करण्याची भाषा करू नये. त्यांना स्मृतीभंश झाला आहे. त्याला इंग्रजीमध्ये डिमेन्शिया असे म्हणतात. त्यांना या सर्व गोष्टींचा विसर पडलेला असेल आणि त्यांना जास्त खुमखुमी असेल तर त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उभे राहावे, असा जोरदार पलटवार श्रीकांत शिंदे यांनी केला. तसेच गणेश नाईक यांनी कल्याण किंवा ठाणे या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे. त्यांना खुलं आव्हान आहे. त्यांनी जिथे उभे राहायचे आहे तिथे राहावे. डॉक्टर श्रीकांत शिंदे तुमच्या विरोधात उभा राहील, असे खुले आव्हानही श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले. त्यानंतर आता नाईक नेमकं काय उत्तर देणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?

गणेश नाईक एका बैठकीत बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी हॉस्पिटलसाठी, बागेसाठी, शाळेसाठी भूखंड दिले गेले नाहीत. हे भूखंड बिल्डरांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले. मी ज्या मंत्रिमंडळात आहे, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला. मी म्हणूनच सीडको, एमआयडीसीकडून जनतेच्या हितासाठी नवी मुंबई महापालिकेला जे भूखंड देण्यात आलेले आहेत, ते लगेच देण्याची व्यवस्था करावा. मी पक्षाच्या शिस्तीचा भक्त आहे. पण ज्या गोष्टीसाठी मी आमदार, मंत्री झालो, तेच बोलू शकलो नाही तर ते मंत्रिपद काय चाटायचे आहे का? अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली.