MPSC पेपरफुटी प्रकरणात किती लाखांचा व्यवहार झाला? Inside Story आली समोर
MPSC पेपर फुटी प्रकरणात 5 लाखांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

कृष्णा सोनारवाडकर : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येऊ लागली आहे. या प्रकरणात तब्बल 5 लाखांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमपीएससीच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये कटाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.
MPSC ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणात 5 लाख रुपयांच्या व्यवहाराचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही बड्या अधिकाऱ्यांचे नावे देखील समोर आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पेपरफुटीच्या कागदपत्रांची देवाणघेवाण MPSC कार्यालयाच्या पार्किंगमध्ये झाल्याचा दावा करण्यात येत आहे. १९ मार्चला तारखेला म्हणजे परीक्षेच्या तीन दिवस आधी सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकटे याने 294 प्रश्नांचा संच बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच दिवशी नकटेने हा प्रश्नसंच अव्वर सचिव अभिजीत लेंडवेला कार्यालयाच्या पार्किंगमध्ये दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर लेंडवेने हा प्रश्नसंच सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे याच्याकडे सोपवल्याचा आरोप आहे. २० तारखेला मराठेने बेलापूरमध्ये कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांना प्रश्नसंच दिल्याचे तपासात समोर आलं आहे. त्यानंतर हा प्रश्नसंच नाशिकमध्ये ऋतुजा पाटील आणि तिच्या वडिलांकडे पोहोचवण्यात आला.
ऋतुजा पाटीलने हाच पेपर गौरव पाटीललाही व्हॉट्सअपवर पाठवून दिला होता. या परीक्षेचा पेपर दिला आणि राज्यात ७ वी आली आहे. गौरव पाटीलने हा पेपर आणखी कोणाला दिला होता का त्याची व्याप्ती किती आहे, याचा तपास सुरू आहे. मात्र सध्या तरी ऋतुजा पाटील ही एकमेव लाभार्थी असल्याचे पोलिसांचे मत आहे. प्रश्नसंचासाठी प्रवीण पाटीलने मराठेला 5 लाख रुपये रोख दिल्याचा क्राईम ब्रँचचा दावा आहे. मराठेने हेच 5 लाख रुपये लेंडेवला, तर लेंडेवने नकटेला दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न परीक्षेत तंतोतंत पर्यायांसह आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पार्किंगपासून कोचिंग अकादमीपर्यंत पोहोचलेल्या या 5 लाखांच्या व्यवहारातून पेपरफुटीच्या कटाचा तपास क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.