96 गुण असणारा उमेदवार घरी, 46 मार्क्सवाला बनणार अधिकारी; MPSC च्या नियमांवर विद्यार्थी नाराज

MPSC Interview Rules : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र 131 अंतर्गत सहायक संचालक (माहिती) पदाच्या भरती प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात 96 गुण मिळवणारा विद्यार्थी अपात्र आणि 46 गुण मिळवणारा पात्र ठरला आहे.

96 गुण असणारा उमेदवार घरी, 46 मार्क्सवाला बनणार अधिकारी; MPSC च्या नियमांवर विद्यार्थी नाराज
MPSC Interview Rules
Image Credit source: Google
| Updated on: Jun 07, 2026 | 5:57 PM

राज्यातील हजारो विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र 131 अंतर्गत सहायक संचालक (माहिती) पदाच्या भरती प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

लेखी परीक्षा घेण्याचा उद्देश काय?

उमेदवारांचे म्हणणे आहे की, लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सध्याच्या पद्धतीत मुलाखतीसाठी निश्चित किमान गुणांची अट असल्यामुळे लेखी परीक्षेत जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांनाही अपात्र ठरवले जाते. जर अंतिम निर्णय मुलाखतीतील पात्रता गुणांवरच अवलंबून असेल, तर लेखी परीक्षा घेण्याचा उद्देश काय? असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.

96 गुण मिळवणारा घरी, 46 गुण मिळवणारा पात्र

अनेक उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी मोठी मेहनत घेतली आणि चांगले गुण मिळवले, मात्र मुलाखतीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्यांची संपूर्ण गुणवत्ता दुर्लक्षित झाल्याचे समोर आले आहे. एखाद्या उमेदवाराला लेखी परीक्षेत 96 गुण मिळाले असले तरी मुलाखतीत पात्रतेपेक्षा एक गुण कमी मिळाल्यास तो अपात्र ठरतो. दुसरीकडे, लेखी परीक्षेत 46 गुण आणि मुलाखतीत केवळ पात्रतेचे 21 गुण मिळवणारा उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र ठरतो. त्यामुळे एकूण गुणसंख्या अधिक असूनही काही उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

अनेक उमेदवारांवर अन्याय

उमेदवारांचे म्हणणे आहे की, राज्यसेवा परीक्षांमध्ये लेखी आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याच धर्तीवर एकूण गुणांचा विचार व्हावा. मुलाखतीत एक गुण कमी मिळाला म्हणून अपात्र ठरवणे आणि कमी एकूण गुण असलेले उमेदवार पात्र ठरणे, हा आमच्यावर अन्याय आहे. सरकारने आणि MPSC ने या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे.

लेखी व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घ्या…

उमेदवारांनी निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच लेखी व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. ज्यांची एकूण गुणसंख्या जास्त, त्यांनाच संधी मिळावी. मुलाखतीतील किमान गुणांच्या अटीमुळे गुणवंत उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

Follow Us