
मुंबईत एक विचित्र अपघात घडला आहे. मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरुन एक आर्टिका कार पुलाचा कठडा तोडून थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली आहे. ही घटना सोमवारी रात्री 10.50 वाजता घडली. वरळी वरून बांद्राला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर एक कारचा अचानक नियंत्रण बिघडला आणि पुलाची रेलिंग तोडून चालक गाडीसह समुद्राच्या पाण्यात गेला. कारमध्ये चालक एकटाच होता. सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे चालकाचा जीव वाचला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वरळी कोस्टल रोडवरून एक कार वरळी वरून बांद्र्याच्या दिशेने जात होती. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या रेलिंगवर आदळली. यामुळे रेलिंग तुटली आणि कार चालकासह समुद्राच्या पाण्यात कोसळली. या कारमधून चालक एकटाच प्रवास करत होता. कार पाण्यात कोसळल्याचे पाहून तिथे कर्तव्यावर तैनात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान धावले आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात उडी टाकली.
सुरक्षा बलाच्या जवानांनी पाण्यात खोलवर चालकाला गाडीतून बाहेर काढले आणि रस्सीच्या मदतीने त्याला किनाऱ्यावर आणले. कारचालकाच्या पोटात पाणी गेले होते, तसेच मार लागल्याने तो जखमी देखील झाला होता. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी चालकच्या पोटातून पाणी काढले, यामुळे या चालकाचा जीव वाचला. वेळेवर मदत मिळाली नसती तर या चालकाचा जीव गेला असता.
या अपघातातील चालकाची जीव वाचला असला तरी आर्टिका कार अद्याप समुद्रातच आहे. या कारचा शोध घेतला जाणार आहे. या घटनेच्या वेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी, जवान, वाहतूक पोलीस , स्थानिक वरळी पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित होते. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे ? चालकाचे नियंत्रण सुटले की वाहन खराब झाले? ब्रेक फेल झाला होता की हा ड्रंक आणि ड्रॉईव्हचा प्रकार आहे याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.