मोठी दगडफेक ते पोलिसांकडून धरपकड, वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा तणाव; नेमकं काय घडलं?

वांद्रे येथे गरीब नगरात अतिक्रमण केलेल्या ठिकाणावर तोडक कारवाई केली जात आहे. या ठिकाणी स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे. विरोध केल्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

मोठी दगडफेक ते पोलिसांकडून धरपकड, वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा तणाव; नेमकं काय घडलं?
bandra encroachment
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2026 | 6:10 PM

Bandra Encroachment Action : वांद्रा येथे रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात आहे. वांद्र्यातील गरीब नगर परिसरात ही कारवाई केली जात आहे. परंतु ही कारवाई करत असताना येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या या तोडक कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली आहे. उत्तरादाखल पोलिसांनीही लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्ज आणि दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली असून पोलिसांच्या उपस्थितीत तोडक कारवाई केली जात आहे.

तोडक कारवाईदरम्यान काय झालं? लाठीचार्ज का केला?

तोडक कारवाई केली जात असताना गरीब नगर भागात लोकांची मोठी गर्दी जमली होती. या तोडक कारवाईला विरोध केला जात होता. लोकांनी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. यावेळी ज्या ठिकाणाहून पोलिसांवर दगड भिरकावले जात होते, त्याच ठिकाणी जाऊन पोलिसांनी तरुणांची धरपकड केली. मिळालेल्या माहितीनुसार साधारण पंधरा ते वीस मिनिटांपासून दगड साठवले जात होते. त्यानंतर हे दगड पोलिसांवर भिरकावण्यात आले.

टप्प्याटप्प्याने तोडक कारवाई सुरू

एकीकडे पोलिसांवर दगड भिरकावले जात असताना दुसरीकडे तोडक कारवाई मात्र थांबवण्यात आलेली नव्हती. सकाळपासून टप्प्याटप्प्याने तोडक कारवाई केली जात आहे. आता ज्या-ज्या तरुणांनी दगडफेक केली त्या तरुणांना पोलिसांकडून पकडले जात आहे. साधारण 50 ते 60 पोलिसांचे पथक या दगडफेकीला सामोरे गेले.

घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून गरीब नगर परिसरात रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. हेच अतिक्रमण आता हटवले जात आहे. पुढचे काही दिवस हे अतिक्रमण सुरू राहणार आहे, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे, असा आरोप केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Follow Us