
मुंबईकरांची लाइफलाइन असलेली रेल्वे अविरत धावत असते. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे प्रामुख्याने असे 3 मार्ग असून यावरून दररोज अक्षरश: लाखो लोकं प्रवास करतात. कामावर जाणारे, इतर कामासाठी, फिरण्यासाठी बाहेर पडणारे, अशा अनेकांचा त्यात समावेश असतो. या मार्गांपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आत्तापर्यंत एसी लोकल आल्याने लोकांचा प्रवास थोडा सुखकर झाला होता. मात्र हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी मात्र ही सुविधा अद्याप सुरू झालेली नव्हती. पण आता हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
हार्बर मार्गावरील लोकांचा प्रवास होणार ‘गारेगार’
येत्या 26 जानेवारीपासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर एसी लोकलच्या रूपात मोठे गिफ्ट मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हार्बरच्या प्रवासीसेवेत पहिली एसी लोकल दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 26 जानेवारीपासून ही रेल्वे सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल मार्गावर सोमवार ते शनिवार या दिवसांत एसी लोकलच्या दररोज 14 फेऱ्या धावणार आहेत. अप आणि डाऊन दिशेने एसी लोकलच्या प्रत्येकी 7 फेऱ्या चालवण्यात येणार असल्यामुळे हार्बरचा प्रवास गारेगार होणार आहे.
सध्या फक्त पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर एसी लोकल धावतात, त्यामुळे प्रवाशांना या लोकलचा लाभ घेता येतो. मात्र हार्बर मार्गावरील नागरिकांना कित्येक दिवसांपासून एसी लोकलची प्रतीक्षा होती. अखेर हार्बरच्या प्रवाशांचे एसी लोकलमधून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून त्यांनाही गारेगार प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे.
असं असेल वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दाखल झालेली नवीन एसी लोकल ट्रेन, ही आता हार्बर मार्गावर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही नवी ट्रेन प्राधान्याने हार्बर मार्गावर चालवण्यासंबंधीत प्रस्ताव ऑपरेशन विभागाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला आता मुख्यालयाच्या पातळीवरून मंजुरी मिळाली असल्याचं समजतं.
त्यामुळे आता 26 जानेवारीपासून वाशी ते वडाळा रोड, पनवेल ते सीएसएमटी, पनवेल ते वडाळा रोड या मार्गांवर एसी लोकल धावणार आहेत. पनवेल येथून सीएसएमटीच्या दिशेने संध्याकाळी 6.37 वाजता शेवटची एसी लोकल सुटेल, तर डाऊन मार्गावर सीएसएमटी येथून रात्री 8 वाजता पनवेलच्या दिशेने शेवटची लोकल सुटणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील नागरिकांनाी आता एसी लोकलचा प्रवास अनुभवता येणार असून तो सुखकर होईल.