Mumbai High Court : मतदानाआधीच बिनविरोध उमेदवार निवडून येण्याच्या मुद्यावर अखेर मुंबई हाय कोर्टाने दिला निर्णय

Mumbai High Court : मतदानाआधी बिनविरोध उमेदवार निवडून येण्याच्या मुद्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उमेदवार बिनविरोध निवडीच्या मुद्याला हाय कोर्टात आव्हान दिलं होतं.

Mumbai High Court : मतदानाआधीच बिनविरोध उमेदवार निवडून येण्याच्या मुद्यावर अखेर मुंबई हाय कोर्टाने दिला निर्णय
Avinash Jadhav
| Updated on: Jan 14, 2026 | 12:41 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धक्का देणारा निर्णय कोर्टाने घेतला आहे. महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, त्याआधीच महाराष्ट्रात वेगवेगळ्या महापालिकांमध्ये 60 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीला अविनाश जाधव यांनी कोर्टात आव्हान दिलं होत. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. सकाळी असीम सरोदे यांनी याचिका कोर्टामोर मेन्शन करताना आज सुनावणीसाठी घेण्यात आल्या याचिकांशी सबंधित याचिका आहे, असं म्हटलं होतं.

मात्र आता प्रत्यक्षात सुनावणीसाठी प्रकरण आल्यावर मात्र त्यांनी आधीच्या याचिकांशी सबंधित नाही पण निवडणुकीशी सबंधित आहे असं विधान केलं. त्यावर न्यायमुर्तींनी आक्षेप घेत तुम्ही कोर्टासमोर अशी चुकीची विधाने कशी काय करू शकता असे म्हणत याचिका फेटाळली. चुकीची विधानं केल्याबद्दल आम्ही आपल्याला दंड आकारत आहोत, असं कोर्टाने म्हटलं. अविनाश जाधव, समीर गांधी यांनी ही याचिका केली होती. केडीएमसी आणि ठाणे या महापालिका क्षेत्रात उमेदवार मोठ्या संख्येने बिनविरोध निवडून आलेत.

तातडीच्या सुनावणीस कोर्टाचा नकार

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करत अविनाश जाधव आणि इतरानी ही याचिका दाखल केलेली होती. अविनाश जाधव यांच्या वतीने वकील असीम सरोदे युक्तिवाद करत आहेत. ते व्हिसीद्वारे जोडले गेले आहेत. इतरही बऱ्याच याचिका हायकोर्टात दाखल असून त्यावर तातडीच्या सुनावणीस कोर्टाने नकार दिलाय. महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या निवडीला याचिकेतून विरोध करण्यात आला होता.

आम्ही दंड आकारतोय आणि ही याचिका फेटाळतोय

“आम्ही निवडणुकीला विरोध करत नाही आहोत. पण बिनविरोध निवड हे जे काही होतय त्याला आमचा विरोध आहे” असा असिम सरोदे यांनी युक्तीवाद केला. त्यावर कोर्टाने म्हटलं की,”तुम्ही चुकीची वक्तव्य करत आहात. चुकीच्या मुद्द्यांवर तुमचा युक्तिवाद आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही दंड आकारतोय आणि ही याचिका फेटाळतोय” अशा शब्दात कोर्टाने असीम सरोदे यांना सुनावलं.