मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, उद्या रेल्वेचा ब्लॉक, मध्य की पश्चिम रेल्वे कुठली वाहतूक मंदावणार ? जाणून घ्या पटापट

मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक असल्याने प्रवाशांना अडचणी येण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक राहील. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक आहे. ट्रान्स हार्बरवरही ब्लॉकचा कालावधी आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द किंवा वळवण्यात येतील. प्रवाशांनी प्रवास आखण्यापूर्वी वेळापत्रक तपासावे.

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, उद्या रेल्वेचा ब्लॉक, मध्य की पश्चिम रेल्वे कुठली वाहतूक मंदावणार ? जाणून घ्या पटापट
रेल्वे मार्गावर ब्लॉक
| Updated on: May 24, 2025 | 8:41 AM

पावसाळा आता तोंडावर आला असून त्यापूर्वी मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेचे काम सुरळीत ठेवण्यासाठी उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरून दररोज लाखो नागरीक प्रवासी करत असतात. रोजच्या रोज त्यांचा भार वाहणाऱ्या रेल्वेची, लोकलची आणि त्या जिथून धावतात त्या मार्गांचीही देखभाल करण्यासाठी अधूनमधून ब्लॉक घेण्यात येतात. तसाच ब्लॉक उद्या मुंबईत घेण्यात येणार आहे.

मध्य की पश्चिम रेल्वे कोणत्या मार्गावर ब्लॉक ?

पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेत रविवारी लोकल सेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मध्य रेल्वेच्या मार्गवर मात्र, उद्या अर्थात रविवार (25 मे रोजी) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.

या ब्लॉकच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, याची नोंदल घेऊनच नागरिकांनी आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवहन करण्यात आलं आहे.

तर ठाणे येथून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या लोकल मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि नंतर माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

‘परे’वर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर मात्र आज, अर्थाक शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येईल. भाईंदर-बोरिवली स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते रात्री 3 पर्यंत 3.30 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर भाईंदर-बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत 3.30 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे

ट्रान्स हार्बरवर 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक

ट्रान्स हर्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/ पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.