मुंबईतील रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही घटना…”
मुंबईत आज सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून ८ प्रवासी पडून मृत्युमुखी पडले. काही जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. गर्दी आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी आजची सकाळ एक हृदयद्रावक बातमी समोर आली. कसाऱ्याहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोकलच्या दरवाज्याला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले, त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एक २३ वर्षीय तरुणीही गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान घडलेल्या या रेल्वे अपघातात ऐरोलीतून कामासाठी निघालेली 23 वर्षीय स्नेहा गौतम दौडे (रा. टिटोळा) ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी ८ वाजताच्या सुमारास ती घरातून कामावर निघाली होती. मात्र तिचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. तिचे नातेवाईक सध्या रुग्णालयात तिची प्रकृती जाणून घेण्यासाठी धाव घेत आहेत. या रुग्णालयात एकूण 9 जणांवर उपचार सुरू असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासन अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलावले आहे. प्रत्यक्षदर्शींनी अपघात कसा घडला आणि त्यांना कशी दुखापत झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 9, 2025
अजित पवारांची प्रतिक्रिया
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली.
ट्रेनमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे…
— Supriya Sule (@supriya_sule) June 9, 2025
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर रेल्वे प्रशासनला जाब विचारत उपाययोजना करण्यासाठी सांगितले आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे धोकादायक आहे. नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण धोकादायक पद्धतीने प्रवास करु नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
