
मराठी बोलण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून त्याचा एक व्हिडीओ सशोल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. त्या मारहाणीच्या निषेधार्थ काल मीरा-भाईंदरमध्ये अनेक व्यापारी तसेच व्यापारी संघटनांनी आंदोलन करत मोर्चा काढला, मारहाणीचा विरोध दर्शवत निषेधही केला. यावरून मनसे नेते, कार्यकर्त्यांवरही बरीच टीका होत असून भाजपाचने नेत्यांनी मनसेला सुनावलं होतं.
मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल
या वरून राजकीय वातावरण तापलेलं असून त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रोखठोक भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांना आणि मनसेला लक्ष्य करणाऱ्या सर्वांनाच संदीप देशपांडेनी सज्जड भाषेत इशाला दिला आहे. ‘ काल भारतीय जनता पक्षाने 2-3 व्यापारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला. त्या बेपारी लोकांना (व्यापारी) माझं सांगणं आहे, बेपारी आहात, बेबापर (व्यापर) करायाला आला आहात, बेपार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका ‘ अशा थेट शब्दांत संदीप देशपांडेनी सर्वांना ठणकावलं आहे. ‘ मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल.’ असा इशाराही त्यांनी दिला.
आणि एकदा बेपारी लोकांनी ठरवावं आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत रहायचं आहे की व्यापार करायचा आहे, हे एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी अशा शब्दांत संदीप देशपांडेनी सज्जड दम दिला.
हिंमत असेल तर मोहम्मद अली रोड, नळबाजारात दाखवा… नितेश राणेंनी दिलं होतं आव्हान
मीरा रोड येथे मराठी भाषेवरून सुरू असलेला वाद मनसे कार्यकर्त्यांनी एका गुजराती रेस्टॉरंट मालकाला मारहाण केल्याने आणखी वाढला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यात राजकीय खळबळ उडाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद पेटला. काहींनी या घटनेचे समर्थन करायला सुरुवात केली तर काहींनी मनसे कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. त्यावर राज्य सरकारचे मंत्री, भाजप नेते नितेश राणे यांनी मनसे नेत्यांना आव्हान दिले होते.
मराठी न बोलता आल्यामुळे मीरा रोडमध्ये एका माणसाला झालेल्या मारहाणीबद्दल महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे म्हणाले की, एका हिंदूला मारहाण करण्यात आली आहे. मी म्हणतो की तुम्ही नळ बाजार आणि मोहमद अली रोड, तिथे
जाऊनही हिंमत दाखवा ना. गोल टोप्या घातलेले,दाढीवाले, ते मराठी बोलतात का? तिथे जाऊन त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजण्याची हिंमत तुमच्यात नाही का? असा सवाल विचारत नितेश राणेंनी मनसे कार्यकर्त्यांना आव्हान दिले होते. आमच्या कोणत्याही हिंदूला अशा पद्धतीने कोणी मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करेल, असा इशाराही नितेश राणेंनी दिला होता.
रझा अकदामीविरोधात मोर्चा काढला तेव्हा भाजप गप्प होतं
राणेंच्या या टीकेलाही मनसे नेते संदीप देशपांडेंनी चोख प्रत्युत्तर दिलं. माझा नितेश राणेंना एक प्रश्न आहे की ज्यावेळी रझा अकदमीचा मोर्चा निघाला होता, तेव्हा आमच्या पोलीस माता-भगिनींवर मुसलमानांनी हात उचलला होता. त्यावेळेस
त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष होता, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तेव्हा सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसले होते. मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडली तेव्हा… काटा चालवणाऱ्यांना आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये, असेही संदीप देशपांडे यांनी थेट सुनावलं.