उत्तर भारतीय की मराठी, मुंबईचा महापौर कोण होणार? नितेश राणेंच्या एका ट्वीटने राजकारणात खळबळ

मुंबईच्या महापौरपदावरून राजकीय वातावरण तापलं असून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उत्तर भारतीय की मराठी, मुंबईचा महापौर कोण होणार? नितेश राणेंच्या एका ट्वीटने राजकारणात खळबळ
nitesh rane
| Updated on: Jan 01, 2026 | 12:33 PM

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सध्या सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये आता थेट महापौर पदावरून युद्ध सुरू झाले आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि तिखट शब्दांत टीका केली आहे. मुंबईच्या महापौरावरून सुरू असलेल्या वादात उडी घेताना नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर आणि मराठी अस्मितेच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच यावेळी त्यांनी मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार,” असे ठामपणे सांगितले.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एमआयएम (MIM) नेते वारिस पठाण यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला. मुंबईतला हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर खान पठाण अब्दुल बनू शकतो किंवा बुरखावाली महिला पण बनू शकतो. तेव्हा ठाकरे गटातून कोणाला काही मिरची लागली का? कोणी बिळातून बाहेर आलं का? कोणी आक्षेप घेतला का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

पण जेव्हा कृपाशंकर सिंग जेव्हा उत्तर भारतीय होईल असे म्हटले तर हे सगळे बिळातून बाहेर आले. बोंबलायला लागले. जण काही या लोकांनी हिंदूमध्ये फुट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसत आहे. पण एक विश्वासाने सांगतो की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार. हर हर महादेव, मुंबई लव्ह महादेव, असे नितेश राणे म्हणाले.

दरम्यान भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना महापौरपदाबद्दल विधान केले होते. “येत्या काळात मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय झाला पाहिजे. मुंबईच्या विकासामध्ये उत्तर भारतीयांचे मोठे योगदान आहे आणि त्यामुळे या समुदायाला मुंबईच्या सर्वोच्च पदावर प्रतिनिधित्व मिळायला हवे, असे कृपाशंकर सिंह यांनी म्हटले होते. या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. त्यांनी भाजपवर मुंबईतून मराठी अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप केला. याच वादात आता नितेश राणे यांनी उडी घेत ठाकरे गटाला सुनावले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.