Ritu Tawde: बाळासाहेब ठाकरेंच्या अपमानावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली, रितू तावडे कडाडल्या!
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याप्रकरणी एकीकडे ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही याप्रकरणावरुन महत्त्वाचे विधान केले आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमानजनक उल्लेख असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला. याच्या निषेधार्थ पुस्तकाची पाने फाडत असतानाच शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला ज्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याप्रकरणी एकीकडे ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही याप्रकरणावरुन महत्त्वाचे विधान केले आहे.
बाळासाहेबांचा अपमान, भाजप-शिवसेनेत जुंपली!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यावरुन आता भारतीय जनता पक्ष अन् शिवसेना शिंदेगटामध्येही जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणावरुन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मोठे विधान केले आहे. “मी सभागृहाच्या आणि समस्त मुंबईकरांच्या वतीने सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे हे आम्हालाही वंदनीय आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. बाळासाहेबांना आम्ही नमन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुर्ण मुंबईचा कारभार सध्या सुरु आहे,” असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.
रितू तावडे काय म्हणाल्या?
तसेच “बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आम्हाला कधीही आवडणार नाही. त्यांच्या पक्षाबाबत आदरणीय एकनाथ शिंदे यावर भाष्य करतील, निर्णय घेतील. आपण काहीही करत असताना हातातील कागदे पडताळून पाहणे गरजेचे आहे,” असे म्हणत रितू तावडे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
शायना एनसींनी मागितली माफी!
दरम्यान, याप्रकरणावरुन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी माफी मागितली आहे. बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते, असं त्यांनी म्हटलं होते.