दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील थेट ‘मातोश्री’वर, नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्यास उत्सुक आहे, आज जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडतंय?
जयंत पाटील
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 26, 2025 | 5:12 PM

महापालिका निवडणुकीसाठी जिथे जिथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही,  तिथे -तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याच्या तयारीत आहे, याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनिकरणाची देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. गुरुवारी  रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक झाली, तर आज अंकुश काकडे आणि बापूसाहेब पठारे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे.

दरम्यान दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या युती आणि विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेसाठी 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

दरम्यान या भेटीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आमची चर्चा सुरू आहे, मी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीच्या चर्चेसाठीच आलो होतो. आमची चर्चा झाली मात्र आम्ही अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाहीत.  आम्ही महाविकास आघाडीमधील घटक आहोत, म्हणून मुंबईमध्ये शिवसेनेसोबत आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी म्हणून लढवावी असं आम्हाला वाटत होतं. परंतु आमची तेवढी ताकद मुंबईमध्ये नाहीये, मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यामुळे आमची जागा वाटपासंदर्भात शिवसेना ठाकरे गटासोबत चर्चा सुरू आहे. चर्चा सकारात्मक झाली आहे, असं यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं.