इंदिरा गांधी सोबत जसं ते सरकार वागलं, तसं राहुल गांधी सोबत हे सरकार वागतंय; अजित पवार यांनी जुना संदर्भ देऊन स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Mar 24, 2023 | 3:11 PM

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राहूल गांधी यांच्यावर सूरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा दिली होती त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंदिरा गांधी सोबत जसं ते सरकार वागलं, तसं राहुल गांधी सोबत हे सरकार वागतंय; अजित पवार यांनी जुना संदर्भ देऊन स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बाब समोर आली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई केली आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सूरत कोर्टाने त्यांना दोषी ठरविल्यानंतर खासदारकी रद्दची कारवाई करण्यात आली आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द केल्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांच्यावर भाष्य केले आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध करत अजित पवार यांनी यावेळेला इंदिरा गांधी यांच्यासंबंधीचा एक संदर्भ देत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले, लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल यांनाहीअशाच पद्धतीने खासदार पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. आणि आज राहुल गांधी यांना काढून टाकण्यात आले.

वास्तविक मतमतांतर असू शकतात, राजकीय पक्षांच्या वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असू शकतात परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय झाला नव्हता, मला तरी अशी कुठली कारवाई आठवत नाही.

हे सुद्धा वाचा

खासदारकी बाबत अशा पद्धतीने कारवाई करणे हे संविधानामध्ये बसत नाही. लोकशाहीमध्ये बसत नाही. वास्तविक प्रत्येकाला आपल्या आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा असला पाहिजे तो संविधानाने त्यांना दिलेला आहे तरीही अशी कारवाई होते हे योग्य नाही.

राहुल गांधी यांच्या बाबत लोकसभेत जो निर्णय घेण्यात आला आहे तो लोकशाहीला धक्का देणारा निर्णय आहे. आम्ही या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहोत. आम्ही संभागृहातून सुद्धा बाहेर पडलो असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारावर आपण चालतो. ज्यांनी आपल्याला घटना दिली त्यामध्ये अशा स्वरूपाची कारवाई बसत नाही. माझे सभागृहात भाषण असतांना मला हे कळलं आणि आम्ही लगेच सभा त्याग केला आहे.

वास्तविक हे जनता काही बघत नाही असे नाही, जनता हे सगळं बघत आहे. कुणीही राज्यकर्त्यांनी, आम्ही राज्यकर्ते असो किंवा ते राज्यकर्ते असो सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. ही आपली देशाची परंपरा आहे, ही आजपर्यंत देशाची पद्धत आहे.
परंतु, त्याला तिलांजली देण्याचं काम या निर्णयाच्या निमित्ताने आपण पाहतोय. अशा प्रकारचा दुसरा निर्णय एका सरकारने घेतला होता. असंच इंदिराजींच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने झाले होते. त्यावेळेस ते सरकार वागलं ते भारतातल्या जनतेला अजिबात आवडलं नव्हतं.

आणि ज्या इंदिरा गांधी यांना 1977 मध्ये पराभूत केलं होतं. त्याच इंदिरा गांधींना पुन्हा 1980 ला प्रचंड बहुमताने पुन्हा देशाच्या पंतप्रधान पदावर बसवण्याचा काम भारतातल्या जनतेने, लोकशाही पद्धतीनं मतदानाच्या माध्यमातून केलं आणि हे आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये अनुभवलेला आहे.

तशाच पद्धतीने आताच्या काळामध्ये या ज्या काही घटना घडतात हे सर्वसामान्य माणसांना अजिबात पटणाऱ्या नाहीत. त्याच्यामुळे जे काही घडलेलं आहे त्याचा पुन्हा एकदा शब्दांमध्ये निषेध करतो असे म्हणत अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.