रेल्वे खोळंब्याचा मुंबईकरांना जबर फटका; एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, मुंबई हादरली!
मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड केबलच्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. यामुळे गाड्या १-२ तास उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या या गोंधळात भांडूप येथे एका तरुणाचा, तर घाटकोपर-विक्रोळी दरम्यान आणखी दोघांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

मुंबईकरांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशीचा प्रचंड सोमवार त्रासदायक ठरला. मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळपासूनच प्रवाशांचे हाल झाले. मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमधून तारा लटकलेल्या आढळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी, अनेक लोकल गाड्या तब्बल एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. या खोळंब्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, सोमवारी मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर घडलेल्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भांडुप स्थानकात एसी लोकलच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर घाटकोपर-विक्रोळी दरम्यान अन्य दोघांचे मृतदेह आढळले. या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
भांडुप येथे एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ येथे ही दुर्दैवी घटना घडली. साहिल थिटे असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे रूळ ओलांडत असताना साहिलला एसी लोकलची धडक बसली. मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घाटकोपर-विक्रोळी दरम्यान आणखी दोघांचा मृत्यू
दरम्यान, घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान आणखी दोन मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलं. सुरुवातीला रेल्वे पोलिसांना घटनास्थळी एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर आणखी एक मृतदेह आढळल्याचं समोर आलं. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पुढील तपासातून आणखी स्पष्ट माहिती समोर येऊ शकते.
दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने सोमवारी अनेक प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब झाला. मुलुंड आणि नाहूर दरम्यान काही प्रवासी रेल्वे रुळांवरून चालत असल्याचेही दिसून आले. लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली होती. एकंदरच मुंबईकरांचा आजचा दिवस मनस्तापाचा गेला.