Mumbai Rain Updates : संकटाचे ढग मुंबईपर्यंत… मुंबईतही शाळा, महाविद्यालयांना तडकाफडकी सुट्ट्या जाहीर; रेड अलर्ट येताच प्रशासन सतर्क

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अंदाजामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनेक ठिकाणी जलमय रस्ते आणि वाहतूक कोंडीचा अनुभव येत असून, पाणीसाठ्यात वाढ अपेक्षित आहे. प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

Mumbai Rain Updates : संकटाचे ढग मुंबईपर्यंत... मुंबईतही शाळा, महाविद्यालयांना तडकाफडकी सुट्ट्या जाहीर; रेड अलर्ट येताच प्रशासन सतर्क
मुंबईत पावसाचा कहर
| Updated on: Jul 04, 2026 | 1:23 PM

ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबई आणि कोकणात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कालच सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईतही आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दिनांक 4 जुलै रोजी दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आयुक्तांनी काढले आदेश

आज दिनांक 4 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी विषयक हवामान खात्याच्या अहवालानुसार नुसार पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शाळांना दुपार सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत आलेले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचतील याबाबत मुख्याध्यापक शिक्षकांनी दक्षता घ्यावी, असं मुंबई पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

रस्त्यांच्या झाल्या नद्या

दरम्यान, सकाळपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. चांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्या रस्त्यांवर चांदिवली विधानसभेचे मनसेचे विभागप्रमुख महेंद्र भानुशाली हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पाहणी करत आहेत आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर उपहासात्मक टीका करत आहेत

ट्रॅफिक जाम

सायन-पनवेल हायवेवर नवी मुबंईतील तुर्भे याठिकाणी मुबंईला जाणाऱ्या लेनवरील वाहतूक संथ गतीने सुरु आहें. तसेचं सायन पनवेल हायवेवर तुर्भेजवळ पाणी साचलं आहे. पावसाचा फटका हा सायन पनवेल हायवेला बसलाय. वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहें. सर्वत्र काळोख निर्माण झाला आहे.

दोन टक्क्यांनी पाणी साठा वाढला

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा 9 टक्क्यांवर आहे. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात 2 दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी या दिवशी हा साठा 50 टक्क्यांवर होता, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

अंधेरी आणि मालाड सबवे बंद

उपनगरांमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहेअंधेरी सबवे, मालाड सबवे आणि दहिसर सबवेसह सर्व भागांमध्ये पाणी साचले आहे. अंधेरी आणि मालाड सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरी वीरा देसाई, आझाद नगर, मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचले आहे. तर, मुंबईतील पवई हिरानंदानी परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळून चार वाहनांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. घटनेनंतर अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचं काम सुरू केलं आहे.

Follow Us