मुंबईत कोसळधार, रेल्वेची सद्यस्थिती काय? कुठून कुठपर्यंत ट्रेन सुरु, पाहा A टू Z अपडेट्स काय?
मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेही उशिराने सुरू आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्या आहेत.

मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेही साधारण अर्धा तास उशिराने सुरु आहे. या पावसाचा फटका केवळ लोकल सेवेलाच नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेची स्थिती काय?
हवामान विभागाने आज, मंगळवार (19 ऑगस्ट 2025) रोजी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. ज्यामुळे स्टेशनवर गर्दी कमी होती. मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका हा नोकरदार वर्गाला बसला आहे. सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे. सायन आणि कुर्ला या भागात रुळांवर पाणी जमा झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. सायन -कुर्ला या भागातील रेल्वे रुळावर ११ इंचापेक्षा जास्त पाणी साचले आहे. साधारणपणे ६ इंच पर्यंत पाणी असेल तर लोकल सेवा सुरू ठेवता येतात. तर ४ इंचापर्यंत पाणी पातळी असल्यास मेल चालवता येतात. पण सध्या ११ इंचाहून अधिक पाणी रुळावर आहे.
तर दुसरीकडे हार्बर मार्गावर कुर्ला – चुनाभट्टी १९ इंच पाणी रूळावर साचले आहे. त्यामुळे सकाळी 11:25 नंतर मेन आणि हार्बर दोन्ही मार्गांवरील उपनगरीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. तसेच धीम्या गतीवरील अनेक लोकल या 11:45 पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. सध्या अनेक लोकल गाड्या सायन आणि दादर दरम्यान रुळांवर चालत येत आहेत. तर काही प्रवाशी स्थानकांवर ताटकळत बसले आहे. जोपर्यंत पाण्याची सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत लोकल सेवा पूर्ववत केल्या जाणार नाही. असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पनवेल ते मानखुर्दपर्यंत हार्बर रेल्वे सुरू आहे. तसेच ठाणे ते वाशीदरम्यानची ट्रान्स हार्बर सेवाही सुरू आहे. मात्र, वाशी ते वडाळा या स्थानकात पाणी भरल्याने हार्बर लाईन बंद करण्यात आली आहे. सध्या वाशी स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मागील एका तासापासून कोणतीही रेल्वे न आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द
पावसाचा फटका केवळ लोकल सेवेलाच नाही, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द किंवा उशिराने धावत आहेत. 11011 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्स्प्रेस, 12071 – जनशताब्दी एक्स्प्रेस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हिंगोली, 22159 – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – एम. जी.आर. चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस, 12188 – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
बेस्ट बसही अडकल्या
केवळ रेल्वेच नाही, तर मुंबईतील बेस्ट बस सेवाही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने विविध बस मार्ग प्रभावित झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर कमरेइतकं पाणी साचल्याने बस अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बस थांबल्या आहेत, तर काही मार्गांवरून बस वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेने समन्वय साधत पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. पाण्याचा निचरा झाल्यावरच लोकल सेवा पुन्हा सुरळीत सुरू होईल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
