Weather Update : मुंबईकरांसाठी रात्र धोक्याची, मुसळधार पावसाचा इशारा; जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज आला
Maharashtra Weather : आजची रात्र मुंबईकरांसाठी धोक्याची असणार आहे. सरकारकडून पुढील 3 तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आजची रात्र मुंबईकरांसाठी धोक्याची असणार आहे. सरकारकडून पुढील 3 तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात जून महिन्यात जवळपास 47 टक्के पाऊसाची तूट निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ एस. डी. सानप यांनी दिली आहे.
एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून संपूर्ण आठवडाभर कोकण, गोवा विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तसेच तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरूच
कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी बसरताना पहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ आहे. दुपारी पावसाची ये जा सुरू होती, मात्र गेल्या दोन पावसाची संततधार सुरू आहे असून अधून-मधून जोरदार सरी बरसात आहेत. सकाळ पासून सुरू असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.
अंधेरी सबवेमध्ये भरले पाणी
मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा फटका सखल भागांना बसत आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सबवे दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करून बंद केला आहे. सध्या पाऊस कमी झाला आहे. तसेच सबवेतील पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. पाणी पूर्णपणे काढल्यानंतरच वाहनांच्या वाहतुकीसाठी सबवे खुला करण्यात येणार आहे.